दापोलीत शिंदे गटाला धक्का ; शंकर साळवींची शिवसेनेत घरवापसी

शिवसेना नेते माजी केंद्रिय मंत्री आणि रायगड लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गिते यांच्या हस्ते शिवसेनेचा भगवा हाती घेत शंकर साळवी यांनी रायगड जिल्हयातील इंदापूर येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आम. संजय कदम, दापोली तालूका शिवसेना (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालूका प्रमुख ऋषिकेश गुजर, तालूका सचिव नरेंद्र करमरकर, विभाग प्रमुख अनंत ऊर्फ रामू साळवी, आयुब मसुरकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शंकर साळवी यांनी आपल्या मुळ शिवसेना पक्षात घर वापसी केली आहे. शंकर साळवींच्या या घर वापसीने दापोलीत शिंदे गटाला मात्र जोरदार धक्का बसला आहे.

दापोलीत सन 1986 पासून शिवसेना पक्षाचे कार्यालयीन कामकाज यशस्वीपणे सांभाळणारे आणि हर्णे जिल्हा परिषद गटाचे अनेक वर्ष विभाग प्रमुख म्हणून शंकर साळवी कार्यरत होते. मात्र मध्यंतरीच्या काळात शंकर साळवी यांनी येथील विदयमान आमदार योगेश कदम यांची साथ संगत धरली.परंतु ती मुळ शिवसेना नसल्याने त्यांचे मन अजिबात रमले नाही. ज्या शिवसेनेचे अगदी प्रतिकुल परिस्थितीत बिजारोपणाच्या कामाचे रोपटे लावले. ते वाढविले त्या रोपटयाला वाऱ्यावर सोडणे म्हणजेच हिंदुहदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची ती प्रतारणा ठरेल. याचा विचार करत शंकर साळवी यांनी पुन्हा आपल्या मुळ शिवसेना पक्षात बुधवारी रायगड लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गिते यांच्या उपस्थित इंदापूर येथे स्वच्छेने पक्ष प्रवेश केला.

शंकर साळवी यांनी सन 1989 पासून लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुक तसेच दापोली नगर पंचायत निवडणुक किंवा गावा गावातील ग्राम पंचायतींच्या निवडणुका असतील प्रत्येक निवडणुकीची अगदी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. अशा या साळवींची ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेली घर वापसीचा शिंदे गटाला हर्णे जिल्हा परिषद गटासह गिम्हवणे पंचायत समिती गण आणि दापोली तालूक्यात मोठा धक्का बसणार आहे. तर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे साळवींच्या घर वापसीमुळे संघटन वाढणार आहे. त्यामुळे साळवींच्या पक्ष प्रवेशाचे महत्व वाढले आहे.