राज्यातील मोडकळीस आलेल्या पोलीस वसाहतींचा तातडीने पुनर्विकास करा! शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांची मागणी

महाराष्ट्रात ज्या-ज्या ठिकाणी पोलिसांच्या वसाहती आहेत. त्यातील अनेक वसाहती या खूपच जुन्या असून काही इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यांचा तातडीने पुनर्विकास करा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार रवींद्र वायकर यांनी विधिमंडळात केली.

विधीमंडळात पोलीस वसाहतींचा मुद्दा रवींद्र वायकर यांनी प्राधान्याने मांडला. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या विशेषतः महिला पोलिसांची संख्या खूपच कमी असल्याने ती वाढवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. जुन्या 6 ते 7 माळ्याच्या पोलीस वसाहतींना लिफ्ट नसल्याने येथे राहणाऱ्या कुटुंबियांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पोलीस वसाहतींचा पुनर्विकास करताना 25 अथवा 30 वर्षं सेवा झालेल्या पोलिसांना बांधकाम शुल्क आकारून कायमस्वरूपी घर देण्याचा विचार करावा, असे वायकर म्हणाले. जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील मेघवाडी, जोगेश्वरी व आरे पोलीस ठाणे पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील न्यायालयांमधील गैरसोयी दूर करून ती अद्ययावत करण्याची गरजही आमदार वायकर यांनी व्यक्त केली.

मजास नाल्यावरील अतिक्रमण, सर्वोदय नगरातील 400 रहिवाशांना घरे, बिंबीसार नगर येथील इमारतींचा पुनर्विकास, जे.व्ही.एल.आर. शाम नगर तलाव ते पश्चिम द्रुतगती महामार्गपर्यंत रखडलेल्या रस्ता रुंदीकरणाचे काम, वेरावली जलाशयाची टाकी नव्याने बांधणे, शिवटेकडी व मजासवाडी येथील रहिवाशांना भेडसावणारा पिण्याचा पाण्याचा प्रश्न, जोगेश्वरी व महाकाली गुंफेचा विकास, फिल्म सिटीचा विकास, आरे रुग्णालय महापालिकेच्या ताब्यात देणे या समस्यांकडेही शासनाने लक्ष देऊन त्या सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करव्यात, अशी मागणी वायकर यांनी यावेळी केली.

रस्ते काँक्रिटीकरणावर हजारो कोटींचा खर्च करता मग आरेतील रस्त्यांसाठी पैसे का नाहीत?

मुंबईतील रस्ते सिमेंट कॉंक्रीटचे करण्यासाठी 6 हजार कोटी खर्च करण्यात येणार आहेत. जी-20साठी सौंदर्यीकरणावर कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले. पण आरेतील 45 किलोमीटरच्या रस्त्यांची दुरावस्था झाली असतानाही त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी 173 कोटी देण्यात येत नाहीत, अशी खंतही आमदार वायकर यांनी व्यक्त केली.