बेशिस्तीचा सागरी सेतू! सेल्फीनंतर आता ऑटोरिक्षाची घुसखोरी

देशातील सर्वात लांबीचा असलेला सागरी सेतू ठरलेला शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू आता बेशिस्तीचा सागरी सेतू ठरू लागला आहे. ताशी 100 किलोमीटर वेगाने गाडी चालवण्याची परवानगी असलेल्या या सागरी सेतूवर थांबण्यास मनाई असतानाही गेल्या दोन दिवसांपासून सर्रासपणे वाहने थांबवून प्रवाशी सेल्फी घेत असताना दिसत आहेत. त्यानंतर आज तर एका रिक्षाचालकानेच परवानगी नसतानाही रिक्षा सेतूवरून चालवल्याने प्रवाशांकडून उलटसुलट चर्चा सुरू आहे.

शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूवर सायकल, रिक्षा, ट्रक्टरसह कमी वेगाने धावणाऱ्या वाहनांना बंदी आहे. तसेच सेतूच्या दोन्ही बाजूला म्हणजे शिवडी आणि चिर्ले येथे एन्ट्री पॉईंटवर टोल प्लाझा आहे. कोणत्या वाहनाला परवानगी द्यायची याचे संपूर्ण नियंत्रण आहे. तरीही सागरी सेतूवरून रिक्षा सुसाट धावत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सागरी सेतूवरून 100 किलोमीटर वेगाने गाडी चालविण्यास परवानगी आहे. रिक्षा ताशी केवळ 25-30 किलोमीटर वेगाने धावते. त्यामुळे मागून ताशी 100 या वेगाने येणाऱ्या वाहनाला अपघात झाला तर कोण जबाबदार, असा सवाल केला जात आहे.