विमानात  छोटी मुलं  पालकांशेजारीच बसणार

बारा वर्षांपर्यंतच्या मुलांना विमानात त्यांचे पालक किंवा पालकांपैकी एकासोबतच आसन मिळेल याची खबरदारी घेण्याचे निर्देश हवाई वाहतूक महासंचालकांनी दिले आहेत. 12 वर्षांखालील मुलांना विमानात त्यांच्या पालकांसोबत बसवण्यात आले नसल्याच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले. एकाच पीएनआर वर प्रवास करणाया मुलांना त्यांच्या पालक/पालकांपैकी किमान एकासह जागा मिळेल याची दक्षता घ्यावी आणि त्याची नोंदही ठेवावी, असे डीजीसीएने म्हटले आहे. विमान कंपन्यांनी अधिक पैसे मिळवण्यासाठी विमानातील जागा विकण्याचे तंत्र गेली काही वर्षे अवलंबले आहे. यामुळे लहान मुलांना त्यांच्या पालकांशेजारी जागा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी महासंचालकांकडे आल्या होत्या. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.