काहींना सत्तेचा माज चढलाय; दमदाटी करणाऱयांना धडा शिकवा! शरद पवार यांची बारामतीकरांना साद

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती मतदारसंघात प्रचारसभांचा धडाका लावला. मतदारसंघात पसरवल्या जात असलेल्या दहशतीवरून यावेळी शरद पवार यांनी नाव न घेता अजित पवार यांना दम भरला आणि दमदाटी करणायांना धडा शिकवा, अशी साद बारामतीकरांना घातली.

काही लोकांना सत्तेचा माज चढला आहे. हा सत्तेचा माज उतरवायला फार वेळ लागणार नाही. ज्यांच्या डोक्यात सत्तेची हवा आहे ते तुम्हाला दमदाटी करत असतील तर तुम्ही चिंता करू नका, हा शरद पवार कायम तुमच्या पाठीशी उभा राहील, असे पवार म्हणाले.

इथे कुणी दमदाटी करतात, पाणी देणार नाही म्हणतात, कुणी नोकरी टिकणार नाही असे सांगतात. दमदाटी आणि दहशतीने लोकांना आपल्याला हवे त्या रस्ताने नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला तुम्हाला धडा शिकवावा लागेल, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

मामा, जरा जपून

आम्ही काहींना बळ आणि पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती मात्र, त्यांचे पाय आज जमिनीवर नाहीत. पाय आणि डोपं दोन्ही हवेत आहे. पण याद राखा सत्तेचा कुणी गैरवापर करत असेल तर त्याला सरळ करण्याचे काम आम्ही दोन दिवसांत करू शकतो… मामा जरा जपून,  असा दम शरद पवार यांनी इंदापूरच्या सभेत दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता भरला.

बारामतीकडे अमेरिकेचेही लक्ष!

मध्यंतरी कन्हेरीच्या सभेत एका कोपऱयात एक अनोळखी माणूस उभा होता. माझ्या लक्षात आले की ते पत्रकार असावेत. त्यांना मी बोलावून घेतले आणि विचारले तर ते म्हणाले मी अमेरिकेतून आलो आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिकेत हिंदुस्थानातील लोकशाही पद्धतीच्या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता असते. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो आहोत. म्हणजे बारामतीच्या निवडणुकीबाबत अमेरिकेलाही चिंता आहे. एवढे महत्त्व तुमच्या लोकांच्या निर्णयावर असणार आहे, असे शरद पवार म्हणाले.