मोदींच्या काळात चीनने हिंदुस्थानची हजारो कि.मी. जमीन लाटली; शरद पवार यांची साताऱयातील सभेत टीका

मोदींच्या कालखंडात देशाच्या सीमांच्या संदर्भातील प्रश्नाला त्यांनी महत्त्व दिले नाही. त्यामुळे चीनने या देशाची हजारो किलोमीटर जमीन ताब्यात घेतली आहे. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार आहे का, याचा निकाल घेण्याची वेळ आली आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सातारा येथे केली.

महाविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ शनिवारी जिल्हा परिषद मैदानावर झालेल्या सभेत पवार बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आपचे नेते खासदार संजय सिंह, खासदार श्रीनिवास पाटील, फौजिया खान, माजी मंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, सचिन अहिर, डॉ. भारत पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, ऍड. उदयसिंह पाटील, दीपक पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, मोदी काहीही सांगत असले तरी, त्यांनी देशासमोर मोठे संकट आणले आहे. या देशाची चार हजार किलोमीटर जमीन चीनने ताब्यात घेतली आहे. तरीही तसे काही नाही, असे मोदी सांगत आहेत. पण, नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळामध्ये देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी माझ्याकडे होती. त्यावेळी प्रत्यक्ष सीमेवर जाऊन मी पाहणी केली आहे. त्या भागाचा आपला अभ्यास आहे. त्यावेळी सीमेच्या रक्षणाची आम्ही काळजी घेतली होती. पण मोदींच्या कालखंडात या प्रश्नाला त्यांनी महत्त्व दिले नाही. त्यामुळे आज या देशाची हजारो किलोमीटर जमीन चीनने लाटली आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला.

शरद पवार यांनी याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका केली. 2014 मध्ये सत्तेवर येण्याआधी मोदी यांनी महागाई कमी करू, शेतमालाला किंमत देऊ, यांसारखी अनेक आश्वासने दिली होती. पण, त्यांनी ती पाळली नाहीत. मोदींची कार्यपद्धती पसंत नाही, अशी भूमिका कोणी घेतली की त्यांना तुरुंगात टाकण्याचे काम ते करतात. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे उदाहरण दिले. हे चित्र बदलायचे असेल तर साताऱयातून शशिकांत शिंदे यांना विजयी करणे हे तुमचे आमचे कर्तव्य आहे. म्हणून महाराष्ट्राचा संपूर्ण देशात लौकिक करण्याचे काम साताऱयातून करा, असे आवाहन त्यांनी केले.

मोदी शेतकऱयांवर सूड घेत आहेत – पृथ्वीराज चव्हाण

n शेती संदर्भातील तीन अन्यायकारक कायदे प्रचंड आंदोलन करून मागे घ्यायला भाग पाडले म्हणून मोदी शेतकऱयांवर सूड घेत आहेत, असा थेट आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रसंगी केला. मोदींनी देशवासीयांना छळले आहे. त्यांनी अर्थव्यवस्थेचे नुकसान केले आहे. निवडणूक रोख्यातून प्रचंड मोठा घोटाळा झाला आहे. ‘चंदा दो धंदा लो’ ही त्यांची नीती आहे. महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असे आसूड त्यांनी ओढले.

खोटे बोलणे हीच मोदींची गॅरंटी – संजयसिंह

n यावेळी आपचे खासदार संजय सिंह यांच्या भाषणालाही उपस्थितांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. ज्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा धनुष्यबाण चोरला, शरद पवार यांचे घडय़ाळ चोरले, त्यांचे डिपॉझिट जप्त करून महाराष्ट्रातील 48च्या 48 जागा विजयी करा, असे जोरदार आवाहन त्यांनी केले. ‘गद्दारांना माफी नाही’, अशी गर्जना करत, त्यांना माफ करू नका आणि मोदींच्या नादाला अजिबात लागू नका. ते टकल्या माणसालाही कंगवा विकतील. खोटे बोलणे ही एकच त्यांची गॅरंटी आहे, अशा शब्दांत त्यांनी मोदींची पिसे काढली.

उदयनराजे अमित शहांपुढे झुकले

n छत्रपती शिवाजी महाराज आदिलशहापुढे झुकले नाहीत, पण आमचे उदयन महाराज अमित शहांपुढे झुकले. त्यांना उमेदवारीसाठी पाच दिवस दिल्लीत ताटकळत थांबावे लागले, अशी टीका संजय सिंह यांनी केली. एक पृथ्वीराज चव्हाण अन्यायाविरुद्ध लढत आहेत, तर दुसरे अशोक चव्हाण पळून गेले असे सांगत, महाराष्ट्र लढण्यावर विश्वास ठेवतो, झुकण्यावर नाही, असे ते म्हणाले.