हिंदुस्थान-इंग्लंड पाचवी कसोटी आजपासून, धर्मशाळेत बर्फवृष्टीसह पावसाचीही बॅटिंग

बर्फवृष्टी, पावसाच्या सावटासह धर्मशाळा आपली दुसरी कसोटी खेळणार आहे. हिंदुस्थानने मालिका 3-1 ने जिंकल्यामुळे पाचव्या कसोटीची निव्वळ औपचारिकता उरली असली तरी  टीम इंडियाची नवी पिढी पाचवा कसोटी क्रिकेट सामना जिंकून विजयाच्या चौकारासाठी सज्ज झाली आहे. दुसरीकडे मालिका गमावली असली तरी हिंदुस्थानला हिंदुस्थानात हरविण्याची मजा काही औरच असते. त्यामुळे मालिकेचा शेवट गोड करण्याच्या निर्धाराने पाहुणा इंग्लंडचा संघही सर्वस्व पणाला लावण्याच्या निर्धारानेच मैदानावर उतरणार आहेत, पण धर्मशाळेवर निसर्गाची वक्रदृष्टी पडल्यामुळे मालिकेतील अखेरच्या कसोटीत क्रिकेटप्रेमींचा उभय संघांच्या बॅटिंग आधी बर्फवृष्टी आणि पावसाचीच बॅटिंग पाहावी लागण्याचीच अधिक शक्यता आहे.

कसोटी मालिका जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान आणखी बळकट करण्याचा टीम इंडियाचा इरादा आहे. मात्र, धर्मशाळा कसोटीवर पहिल्या दिवशी 80 टक्के पावसाचे सावट असून पुढील तीन दिवस हवामान स्वच्छ राहण्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. पाचव्या दिवशी पुन्हा पावसाच्या शक्यतेचा अंदाज आहे.

आता पडिक्कलचे पदार्पण

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत रजत पाटीदारने सर्वांची निराशा केलीय. त्यामुळे आता पडिक्कलच्या पदार्पणाची वेळ आली आहे, मात्र पडिक्कलच्या पदार्पणासाठी रजत पाटीदारलाच बाकावर बसावे लागण्याची दाट शक्यता आहे. गेल्या तीन कसोटी सामन्यांतील सहा डावांत पाटीदारने 32, 9, 5, 0, 17, 0 अशा अपयशी खेळी करत केवळ 63 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला सलग चौथ्या कसोटीत पाटीदारला खेळवणे पडिक्कलवर अन्याय असेल.

…तर पराभव अन् विजयाची बरोबरी!

धर्मशाळेत प्रथमच कसोटी सामना खेळला जात आहे.  जर हिंदुस्थानने धर्मशाळेतही इंग्लंडचा पराभव केला तर हा आपला 178 वा कसोटी विजय ठरेल. आजवर 578 कसोटी खेळणाऱ्या हिंदुस्थानने 177 कसोटीत विजय नोंदविले आहेत तर 178 कसोटीत हार मानावी लागली आहे. धर्मशाळेत हिंदुस्थानच्या जय-पराजयाचा आकडा बरोबर होऊ शकतो. कसोटी इतिहासात आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान हे चारच संघ पराभवांपेक्षा जास्त कसोटीत विजयी ठरले आहेत. हिंदुस्थानही या यादीत आपले नाव लवकरच नोंदवू शकतो.

इंग्लंड संघात एक बदल

मालिका आधीच गमावलेल्या इंग्लंडने आपल्या संघात एक बदल केलाय. वेगवान गोलंदाज मार्क वुडला ओली रॉबिन्सनच्या  जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. वुडने पहिला आणि तिसरा कसोटी सामना खेळला होता. जेम्स अॅण्डरसन व टॉम हार्टली यांचे संघातील स्थान टिकविण्यात यशस्वी ठरले. इंग्लंडने आपला फलंदाजी क्रम कायम ठेवलाय. झॅक क्रॉऊली व बेन डकेत हे डावाची सुरुवात करतील. ओली पोप, जो रूट व जॉनी बेयरस्टो हे मधल्या फळीत कायम असतील. बेन पह्क्स यष्टिरक्षक फलंदाज असून कर्णधारपदाची धुरा बेन स्टोक्सच्या खांद्यावर कायम आहे.