भाजप नेत्याने ममता बॅनर्जींची खिल्ली उडवली; TMC ची निवडणूक आयोगात तक्रार

निवडणुका तोंडावर असताना आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू आहे. अशातच भाजपचे नेते दिलीप घोष यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. आता तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी घोष यांच्या त्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले आहे. घोष यांच्या वक्तव्यातून त्यांची वृत्ती दिसते, असा पलटवार तृणमूल नेत्यांनी केला आहे.

भाजप नेते दिलीप घोष यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ते ममता बॅनर्जी यांच्या कौटुंबीक पार्श्वभूमीची खिल्ली उडवताना दिसत आहेत. ममता बॅनर्जी गोव्याला जातात त्यावेळी बोलतात त्या गोव्याची मुलगी आहेत, त्या त्रिपुराला जातात त्यावेळी त्या बोलतात त्या त्रिपुराची मुलगी आहेत. त्यामुळे त्यांनी आधी स्पष्ट करावं, असे ते या व्हिडीओत ते म्हणतायत. तृणमुल काँग्रेसने “बांगला निजेर मे के चाय (बंगालला स्वतःची मुलगी हवी)” असा नारा दिला आहे. ,

घोष यांच्या त्या व्हिडिओवर तृणमूल काँग्रेसने निशाणा साधला आहे. त्यांनी पलटवार करत घोष यांची यातून वृत्ती दिसते. पश्चिम बंगालच्या महिला आणि बाल विकास मंत्री शशी पांजा म्हणाल्या की, ‘घोष यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार देण्यात आली आहे.’ पुढे पक्षाकडून हेही सांगण्यात आले की, ‘दिलीप घोष यांना महिलांबाबत अजिबात आदर नाही, मग ती हिंदू धर्माची प्रतिष्ठीत देवी असो किंवा हिंदुस्थानची एकमात्र महिला मुख्यमंत्री असो’, असे त्या म्हणाल्या.