पूर्व-पश्चिम द्र्रुतगती मार्गांचा खड्डेमुक्ती ऍक्शन प्लॅन यशस्वी, दोन्ही मार्गांसाठी स्वतंत्र कंत्राटदार

दरवर्षी खड्डय़ांमुळे टीकेचा धनी होत असलेल्या पालिकेने या वर्षी पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग एमएमआरडीएकडून आपल्या ताब्यात घेतल्यानंतर हे मार्ग या वर्षी खड्डेमुक्त होत आहेत. यासाठी पालिकेने दोन्ही मार्गांसाठी स्वतंत्र पंत्राटदार नेमून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली आहे. हे रस्ते ताब्यात घेतल्यानंतर पहिल्यांदाच योग्यरीतीने काम होताना दिसत आहे.  

मुंबईत पालिकेच्या अखत्यारीत सुमारे 2 हजार किमीचे रस्ते आहेत. याशिवाय मुंबईत एमएमआरडीए, एमएसआरडीसी, एमएमआरसीएल, पीडब्ल्यूडी, एमबीपीटी, एएआय, बीएआरसी  अशा विविध 15 हून अधिक प्राधिकारणांचे शेकडो किमी रस्ते पालिका क्षेत्रात येतात. यामध्ये पालिकेच्या अखत्यारीतील रस्त्यांची देखभालदुरुस्ती पालिकेकडून केली जाते, मात्र विशेषतः पावसाळय़ात सरकारी किंवा इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि रस्त्यांच्या दुरवस्थेसाठी पालिकेलाच जबाबदार धरून जोरदार टीका केली जाते. या पार्श्वभूमीवर पालिकेने मुंबई उच्च न्यायालयात खड्डय़ांबाबत पालिकेची भूमिका मांडताना तीन वर्षांत पालिका हे रस्ते खड्डेमुक्त करेल, असा दावा करीत मुंबईतील रस्ते आपल्या ताब्यात घेतले होते. यानंतर पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध काम केल्यामुळे या वर्षी या रस्त्यावर प्रवास सुखकारक बनला आहे.

अशी झाली कार्यवाही

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग 3 ऑक्टोबर 2022 ला हस्तांतरित करण्यात आले. सुमारे 27.85 किलोमीटर लांबीच्या व 42 मीटर रुंदीचा पश्चिम द्रुतगती महामार्ग, तर  शीव ते मुलुंड हा पूर्व द्रुतगती महामार्ग हा 18.6 किलोमीटर लांबीचा असून 60 मीटर रुंद असा आहे.

या दोन्ही मार्गांवरील पावसाळापूर्व व पावसाळय़ातील खड्डे भरण्यासाठी खराब भागाचा विकास करण्यासाठी तसेच सेवा रस्ते, पदपथ यांची देखभाल, गटारांवरील झाकणे बसवण्याचे काम करण्यात येत आहे.