रोहित पवार यांना ईडीची नोटीस

बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना समन्स बजावले आहे. ईडीने त्यांना बुधवार 24 जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. काही दिवसांपूर्वी बारामती अॅग्रो कारखाना आणि रोहित पावारांच्या संबंधित सात ठिकाणी धाडी टाकून तपास केला होता.

बारामती अॅग्रोमधील कथित गैरव्यवहार प्रकरणात मागील काही दिवसांपासून ईडीकडून तपास सुरू आहे. अलिकडेच पंधरा दिवसांपूर्वी बारामती अॅग्रोचे सीईओ आमदार रोहित परदेशात असताना ईडीच्या पथकाने बारामती अॅग्रो आणि रोहित पवार यांच्याशी संबंधित पुणे आणि बारामतीमधील ठिकाणांवर धाडी टाकून तपास केला होता. त्यानंतर आता समन्स बजावून त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.

22 पिंवा 23 तारखेला चौकशीला बोलवा

मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा असून राज्यभरातून आंदोलक मुंबईला येत आहेत. त्यामुळे 24 ऐवजी 22 पिंवा 23 तारखेला चौकशीला बोलवा, तशी माझी तयारी आहे, अशी विनंती मी ईडीला केली आहे, असे रोहित पवार यांनी एक्सच्या माध्यमातून स्पष्ट केले. तपासाला सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. यात अधिकारी चुकीचे आहेत असे मला वाटत नाही. ते केवळ आदेशाचे पालन करून त्यांचे काम करत आहेत असेही रोहित पवार यांनी नमूद केले.