मिंध्यांना दाखवला वसमतकरांनी हिसका! सभेकडे पाठ फिरवली

हिंगोली मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या मिंध्यांना वसमतकरांनी चांगलाच हिसका दाखवला. वसमतकरांनी सभेकडे पाठ फिरवल्याने महायुतीच्या पदाधिकार्‍यांना लोक गोळा करण्यासाठी वणवण करावी लागली. लोकच नसल्याने मिंधे तब्बल दोन तास ताटकळले. शेवटी मिंध्यांना अजितदादा गटाचे आमदार राजू नवघरे यांच्या घरी पाहुणचारासाठी जावे लागले.

वसमत येथे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहाळीकर यांच्या प्रचारासाठी आज सकाळी 10 वाजता मिंध्यांची सभा ठेवण्यात आली होती. सभेसाठी मिंध्यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले. परंतु सभास्थळी कोणीच नव्हते. त्यामुळे मिंधे आमदार राजू नवघरे यांच्या घरी चहापानासाठी गेले. लोक येण्याची वाट बघत तब्बल दोन तास त्यांना तेथेच ताटकळत बसावे लागले. मुख्यमंत्री आले पण लोकच आले नसल्याने महायुतीच्या पदाधिकार्‍यांची पाचावर धारण बसली. सभेसाठी गल्लीबोळातून माणसे आणण्यासाठी या पदाधिकार्‍यांनी वणवण केली. पण अगदी बोटावर मोजण्याएवढेच लोक आले. उपमुख्यमंत्री अजित पवार येणार होते पण त्यांनी ऐनवेळी दांडी मारली. भाजपचे खासदार अशोक चव्हाण हे मराठा आंदोलकांच्या धास्तीने फिरकले नाहीत. गेलाबाजार भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनीही पाठ फिरवली.

लोक येत नसल्याचे पाहून शेवटी सभा सुरू करण्यात आली. यावेळी बोलताना आमदार राजू नवघरे यांनी मिंध्यांच्या तोंडावरच युतीधर्मावरून आकांडतांडव केले. हळद संशोधन केंद्रावरूनही त्यांनी राजीनामा देण्याची धमकी दिली. लावणीफेम हेमंत पाटील यांच्याबद्दलही त्यांनी तक्रारींचा सूर लावला. हे पाहून दुसरे गद्दार आमदार संतोष बांगर यांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु आमदार नवघरे यांनी तुम्ही मध्ये बोलू नका, असे त्यांनाही सुनावले. आमदार राजू नवघरे यांच्या आरोपांवर चकार शब्दही न बोलता तुमची सगळी कामे मी करेन, अशी मखलाशी करत दुसर्‍या सभेला जायचे, असे म्हणत मिंध्यांनी सभेतून काढता पाय घेतला.