राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नोटीस 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना केंद्रीय निवडणूक आयोगाने आज नोटीस बजावली. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी आयोगाकडून तीन आठवडय़ांची मुदत देण्यात आली आहे.

अजित पवार यांनी 30 जून रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलेल्या एका याचिकेत, आपणच पक्षाचे प्रमुख आहोत, त्यामुळे पक्षाचे नाव व चिन्ह आपल्याला देण्यात यावे, अशी विनंती केली होती. या याचिकेच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना नोटीस बजावली.

पक्षाशी संबंधित सर्व कागदोपत्री पुरावे आयोगाकडे सादर करण्यात यावे, असे आयोगाने नोटिशीत नमूद केले असून त्यासाठी दोन्ही गटांना तीन आठवडय़ांची मुदत दिली गेली आहे.