अटकेच्या भीतीमुळेच फडणवीसांनी शिवसेना फोडली; संजय राऊत यांचा पलटवार

उद्धव ठाकरे सरकार देवेंद्र फडणवीस, आशीष शेलार यांना अटक करणार होते असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्याला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. फोन टॅपिंग प्रकरणात अटकेच्या भीतीमुळेच फडणवीस यांनी शिंदेंवर दबाव आणून शिवसेना फोडली, असा पलटवार संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदेंचे आरोप फेटाळून लावले. शिंदे यांचे वक्तव्य हे मूर्खपणाचे असून कोणत्याही गुन्हेगाराला मुख्यमंत्री नाही तर सरकार अटक करते असे संजय राऊत म्हणाले. गुन्हेगार कितीही मोठा असो कायद्यासमोर सर्व समान आहेत असे शिंदेंचे आताचे बॉस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सांगतात. त्यामुळेच मोदी सरकारने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. बऱयाचशा मंत्र्यांवर आणि आमदार, खासदारांवर काही ना काही गुन्हा टाकून त्यांना अटक करण्यात आली, असे संजय राऊत म्हणाले.

फडणवीस, शेलार, प्रवीण दरेकर यांना महाविकास आघाडीचे सरकार का अटक करणार होते याबद्दलही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन बेकायदेशीररीत्या टॅप केल्याच्या प्रकरणात फडणवीस हे आरोपी होती. त्यांची चौकशी सुरू होती आणि अटक होणार याची जाणीव फडणवीसांना होती. रश्मी शुक्ला ज्या आता पोलीस महासंचालक आहेत त्यांच्या माध्यमातून फडणवीसांनी त्यावेळी फोन टॅपिंग करून विरोधकांवर पाळत ठेवली होती. नंतर शुक्ला यांच्यावरील गुन्हे मिंधे सरकारने मागे घेतले, असे सांगताना, गुन्हे का मागे घेतले असा सवालही संजय राऊत यांनी केला.

भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई बँक लोन घोटाळय़ाची चौकशी सुरू होती. हजारो कोटींचा घोटाळा होता. प्रसाद लाड आणि आशीष शेलार यांच्यावरही गुन्हे होते. अगदी एकनाथ शिंदेंनाही विचारा की त्यांना मोदी सरकार का अटक करणार होते. या चौघांविरुद्ध चौकशा लागल्या तेव्हा मोदी सरकार आणि फडणवीसांनी शिंदेंवर शिवसेनेचे आमदार फोडण्यासाठी दबाव आणला, नाहीतर तुम्हाला अटक करू अशी धमकी दिली, असा जोरदार हल्ला संजय राऊत यांनी चढवला.

ते कायद्यापेक्षा मोठे आहेत का?

बेकायदेशीरपणे पह्न टॅपिंग करणे हा इंडियन टेलिग्राफ अॅक्ट, इंडियन एव्हिडन्स अॅक्ट व अन्य कायद्यांनुसार गुन्हा आहे. जगामध्ये बेकायदा फोन टॅपिंगचा गुन्हा एक भयंकर गुन्हा मानला जातो आणि त्यात अटक करून तुरुंगात टाकण्याची तरतूद आहे, असे संजय राऊत पुढे म्हणाले. अशा गुह्यात फडणवीस यांना अटक न करायला ते काय अनचटेबल आहेत का, कायद्यापेक्षा मोठे आहेत का, असा सवालही खासदार राऊत यांनी उपस्थित केला.

आपल्या देशात पंतप्रधान, राज्यपालांवर कारवाई झालेली आहे. मग शिंदे पंचकावर गुन्हे असतील आणि सरकार चौकशी करत असेल तर त्यांचा तीळपापड का व्हावा अशी विचारणा संजय राऊत यांनी केली. केंद्रातले सरकार शंभर टक्के बदलत आहे. आता इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे आणि त्यावेळी भाजपने रद्द केलेले गुन्हे पुन्हा बाहेर काढू, फायली पुन्हा उघडल्या जातील, चौकशा लागतील आणि कायदेशीर कारवाई होईल, असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला.