‘गदर-2’ तिकीटबारीवर सुस्साट, 3 दिवसात 100 कोटींचा गल्ला; ‘बाहुबली’लाही धुळ चारली

अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांचा ‘गदर-2’ हा चित्रपट तिकीटबारीवर कल्ला करतोय. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तुफान गल्ला जमवात कमाईचे रेकॉर्ड मोडले आहेत. अवघ्या तीन दिवसांमध्ये या चित्रपटाने 100 कोटी क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. तसेच प्रभासच्या सुपरहिट ‘बाहुबली’ चित्रपटाचा विक्रमही ‘गदर-2’ने मोडला आहे.

पहिल्या दोन दिवसात 83 कोटींची गल्ला जमवणाऱ्या ‘गदर-2’ने तिसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई केली आहे. सलगच्या सुट्ट्यांमुळे अनेक ठिकाणी ‘गदर-2’चे शो हाऊसफुल्ल होत आहेत. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळणाऱ्या ‘गदर-2’ने पहिल्या दिवशी 40.1 कोटी, तर दुसऱ्या दिवशी 43.8 कोटी रुपयांची कमाई केली होती.

रविवारी या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडत 50 कोटींचा गल्ला जमवला. पहिल्या तीन दिवसात या चित्रपटाने 133.18 कोटी कमावले आहेत. सनी देओल याच्या कारकिर्दीतील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. याआधी सनी देओलच्या ‘गदर-एक प्रेम कथा’ या चित्रपटाने 76.65 कोटी कमावले होते.

‘बाहुबली-2’चा विक्रम मोडला

‘गदर-2’ने प्रभासच्या ‘बाहुबली-2’ या चित्रपटाचाही विक्रम मोडला आहे. ‘बाहुबली-2’ने पहिल्या तीन दिवसात हिंदीत 74.4 कोटींचा गल्ला जमवला होता. तर ‘बाहुबली-बिगिनिंग’ने 22.35 कोटींची कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटांच्या तुलनेमध्ये सनी देओलच्या ‘गदर-2’ने तिकीटबारीवर हवा केली आहे.

‘गदर-2’ची कथा काय?

वडील आपल्या पोरासाठी काय करू शकतात हे या चित्रपटात दाखवले आहे. ‘गदर-2’मध्ये तारासिंगचा मुलगा चरणजीत सिंग मोठा झाल्याचे दाखवले आहे. चरणजीतही वडिलांप्रमाणे देशभक्त असून यादरम्यान तो पाकिस्तानच्या तावडीत सापडतो. पुढे तारासिंग मुलाला वाचवण्यासाठी काय-काय करतो हे यात दाखवले आहे.