गेलही गेला! 50 हजार कोटींचा आणखी एक प्रकल्प राज्यातून बाहेर; अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्राच्या मार्गावर असलेले वेदांता-फॉक्सकॉन, एअरबस टाटा, सॅफ्रन हे प्रकल्प परराज्यात गेले असतानाच आता आणखी एक मोठा प्रकल्प मध्य प्रदेशात गेल्याची माहिती आता समोर येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार अंबादास दानवे यांनी आरोप केला आहे की, गेल इंडियाचा 50 हजार कोटींचा प्रकल्प आता मध्य प्रदेशात गेला आहे.

अंबादास दानवे यांनी X वर पोस्ट करून राज्यातील मिंधे सरकारला खरमरीत सवाल केले आहेत. आपल्या पोस्टमध्ये अंबादास दानवे म्हणतात की, ‘महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर किंवा दाभोळ येथे गेल इंडिया 50 हजार कोटींची गुंतवणूक करून इथेन क्रॅकिंग युनिट उभारणार होते. आता हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता मध्यप्रदेशच्या सिहोर येथे उभारला जाणार आहे’. पढे आपल्या पोस्टमध्ये त्यांनी प्रश्न केला आहे की, ‘हा प्रकल्प महाराष्ट्राचा विचार करत असताना मध्य प्रदेशात कसा गेला? महाराष्ट्राचा वाट्याला येणारा रोजगार असा सहज बाहेर कसा गेला? याचे उत्तर द्या’.

याच X वरील पोस्टमध्ये त्यांनी आणखी तीन मूलभूत प्रश्न विचारले आहेत. ते म्हणतात, ‘महाराष्ट्राला या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत….
1. प्रकल्पाने जागेसाठी विचारणा केली होती का? 2. विचार केला होता तर त्यांनी महाराष्ट्र का नाकारला? 3. सरकारी कंपनी असल्याने मध्य प्रदेशात हा प्रकल्प नेण्यासाठी केंद्राने दबाव टाकला का? याची उत्तरे सरकारने द्यावी, एवढी अपेक्षा आहे’.

इतका मोठा प्रकल्प राज्यातून गेल्याच्या वृत्तानंतर राज्यातील जनतेच्या मनात संताप आहे. सोशल मीडियावर देखील यूझर संताप व्यक्त करत आहे.