परळ-लालबागमध्ये भाविकांची गर्दी; मुंबईत दोन दिवसांत 41 राजे आणि सम्राट झाले विराजमान

ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांचे आगमन

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांत मिळून परळ वर्कशॉप, करी रोडमधील गणसंकुल आणि परळ-लालबाग परिसरातील कार्यशाळांमधून मुंबई आणि मुंबईबाहेरच्या 25 फुटांपर्यंतच्या तब्बल 41 राजे आणि सम्राटांनी मंडपांकडे प्रस्थान केले. आगमन सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ साठवण्यासाठी कार्यकर्त्यांबरोबरच हजारो भाविकांनी लालबाग-परळमध्ये मोठी गर्दी केली होती. दरम्यान, चिंचपोकळी ते परळमधील गौरीशंकर या मार्गावरील मोठी वाहने आणि बेस्टची वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली होती.

गणेशोत्सवाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत असून मुंबईसह राज्यभरात भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे. मुंबईतील 12 हजार सार्वजनिक मंडळांचे देखावे, सजावट पूर्ण झाली असून विद्युत रोषणाईने मंडप सजले आहेत. परळ वर्कशॉप आणि गणसंकुलातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे बाप्पा मंडपांकडे निघाले. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने गिरीश वालावलकर, दिलीप खंडागळे, अमित कोकाटे, आशीष नरे, गणेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या आगमन मिरवणुका निघाल्या.

अखिल चंदनकाडीच्या ‘गोड गणपती’ला हौशी बाल दहीहंडी मंडळाने सहा थर रचून सलामी दिली.

शनिवारी आगमन झालेले बाप्पा
हनुमान सेना गणेश मंडळ -हैदराबाद, बिलिमोराचा चिंतामणी (कलागंध आर्ट्स, परळ), परळचा महाराजा (मूर्तिकार अरुण दत्ते), कोल्हापूरचा सम्राट (मूर्तिकार राजन झाड), मुंबईचा युवराज (गणेश आर्ट्स, भांडुप,) सहारा दरवाजा राजा (स्टुडिओ विजय आर. खातू), कोल्हापूरचा चिंतामणी – शहीद भगतसिंह तरुण मंडळ (मूर्तिकार विजय खातू), कुलाबाचा राजा (कलासागर आर्ट्स, निखिल राजन खातू), मुंबईचा पेशवा (मूर्तिकार दिगंबर मयेकर).

अखिल चंदनवाडी, मालाडचा राजा-गोरसवाडी, खेतवाडीचा विघ्नहर्ता, मुंबईचा सम्राट, मुंबादेवीचा गणराज, जोगेश्वरीचा राजा, गिरणगावचा राजा, भोईवाडय़ाचा महाराजा, श्रीनगरचा महाराजा, नटराज मार्केटचा राजा, धारावीचा वरदविनायक, गौरीपाडय़ाचा गौरीनंदन, साकीनाक्याचा महाराजा, कोल्हापूरचा गणाधीश, मराठी मित्र मंडळ, साईदया मित्र मंडळ (मूर्तिकार राजन झाड), स्लेटर रोडचा राजा, मलबार हिलचा राजा, ग्रॅण्ट रोडचा महागणपती (मूर्तिकार अरुण दत्ते), कुलाब्याचा सम्राट, मेट्रोचा राजा, फोर्टचा राजा (मूर्तीकार निखिल खातू), मुंबईचा महाराजा, खेतवाडीचा राजा (मूर्तिकार कृणाल पाटील), लीगचा राजा (मूर्तिकार अशोक परब, बकरी अड्डा), मुंबईचा एकटा राजा (मूर्तिकार राजू शिंदे), दुसऱया खत्तर गल्लीचा मोरया (मूर्तिकार सतीश कांदळगावकर), लक्ष्मी कॉटेजचा लंबोदर (मूर्तिकार सतीश वळीवडेकर), ताडदेवचा राजा (स्टुडिओ विजय खातू), लव्हलेनचा राजा (मूर्तिकार उदय खातू), मुंबईचा मोरया (शिवाई आर्ट्स), पंचशीलचा विघ्नहर्ता (मूर्तिकार गणेश पोहेकर).