गणाधीश..गणनायक..गणाराया…जाणून घ्या आपल्या लाडक्या बाप्पाची नावे…

आज घराघरात आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये लाडक्या गणारायाचे आगमन झाले आहे. भक्तीभावात गणरायांची प्राणप्रतिष्ठापना करत त्यांची पूजाअर्चना करण्यात येत आहे. गणरायासाठी बाप्पा हा शब्द आबालवृद्ध वापरतात. त्याचप्रमाणे देशभरात बाप्पा अनेक नावांनी ओळखला जातो. गणरायाला मिळालेली ही नावे आणि त्यामागची कथा रंजक आहे.

गणरायाच्या जन्मकथेनुसार त्याला गजानान हे नाव प्राप्त झाले. तसेच त्यावेळी अनेक देवतांनी गणेशाला वर देत त्याला देवांचा सेनापती नियुक्त केले आणि अग्रपूजेचा मान दिला. त्यामुळे गणाधीश, गणनायक, गणपती,गणाधिपती अशी बाप्पाची नावे रुढ झाली. त्याचप्रमाणे गणेश हा 64 कला आणि विद्येची देवता आहे. त्यामुळे विद्यानिधी, विद्याधीश अशीही बाप्पाची नावे प्रचलीत आहेत. पार्वतीच्या नावावरून गणेशाला गिरीजात्मज असेही म्हटले जाते. जुन्नर येथील लेण्याद्री हे अष्टविनायकांपैकी महत्त्वाचे स्थान आहे.

गणेशाचे वाहन मूषक असूनही गणेशाला मयुरेश्वर म्हटले जाते. असून निर्दालनासाठी श्रीगणेशाने मयूर हे वाहन वापरले होते. त्यामुळे त्याला हेनाव प्राप्त झाले. शिवहर, पार्वतीपुत्र अशीही नावे गणपतीला आहेत. तसेच त्याच्या देहयष्टीवरून गणेशाला लंबोदर हे नावही मिळाले आहे. गणेशाचे विनायक हे नाव दक्षिणेत प्रसिद्ध आहे. हेरंब म्हणजे दीनांचा तारणकर्ता…वक्रतुण्ड, एकदंत, महोदय, गजानन, विकट आणि लंबोदर ही गणपतीची देहविशेष दर्शविणारी नावे आहेत.

गणपतीचा प्रथम उल्लेख प्राचीनतम हिंदू धर्मग्रंथ असलेल्या ऋग्वेदात मिळतो.गणानाम गणपतीम् हवामहे… आणि विषु सीदा गणपते.. या ऋचांमध्ये गणपतीचा उल्लेख आहे. अनार्यांच्या हस्तिदेवता व लम्बोदर यक्षाच्या एकत्रीकरणातून गणेश संकल्पना निर्मिली गेली. गणेश या मूळ अनार्य देवतेचे आर्यीकरण झाले असावे, असे संशोधक मानतात. गुप्त काळापासूनच या देवतेची स्वतंत्र पूजा प्रचलित झाली, असे अभ्यासक मानतात. गुप्त काळात गणपती देवता शुभ समजण्यात येऊ लागली. गुप्त काळानंतर गणेश पूजन हे प्रथम करण्यात येऊ लागले. या काळानंतर इ. स. 12-13 व्या शतकानंतर गणपतीला बाप्पा म्हणण्यात येऊ लागले, अशी शक्यता आहे. परंतु, या शब्दाची लोकप्रियता 18 व्या शतकानंतर वाढत गेली.

प्राकृत भाषांमध्ये बाप्पा शब्द आढळतो. वडिलांना बाप्पा म्हणत असत. आजही उडिया, गुजराती भाषांमध्ये वडिलांना बाप्पा म्हणतात. बाप्पा हे आदरार्थी आहे. वडिलांना असणारा मान या शब्दामध्ये आहे. गणपती ही सर्वांची अधिपती देवता असल्यामुळे ‘युनिव्हर्सल फादर’ हा अर्थ असणारा ‘बाप्पा’ हा शब्द वापरण्यात येऊ लागला. पुढे हा शब्द रूढ झाला. वडील या नात्यामध्ये आदर आणि आपुलकी असते. जिव्हाळा असतो. गणपती ही लडिवाळ भक्ती चालू शकणारी एक देवता आहे. यामुळे गणपतीला प्रामुख्याने बाप्पा म्हटले जाते. ‘देव’ या अर्थीसुध्दा ‘बाप्पा’ हा शब्द उत्तर भारतात वापरताना दिसतात. अथर्वशीर्षातही गणपतीचे एकदंत हे नाव येते. गणेश सहस्त्रनामावली लाडक्या बाप्पाची हजार नावे दिली आहेत. मात्र, आबालवृद्धांसाठी हा लाडका बाप्पाच असतो.