मुंबईतील मोठ्या बाप्पांचे वाजतगाजत आगमन, 130 हून जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा विराजमान

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठय़ा बाप्पांचा मंडपात विराजमान होण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे मुंबईसह मुंबईबाहेरच्या सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांची आज वाजतगाजत आगमन मिरवणूक निघाली. सुमारे 130 हून जास्त मंडळांचे बाप्पा आज मंडपांमध्ये विराजमान झाले. दरम्यान, शनिवारी काही कारणांमुळे आगमन रखडलेल्या मंडळांच्या बाप्पांचेही आज आगमन झाले. शनिवारी 36 सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांचे आगमन झाले होते.

मुंबईत गर्दी, वाहतूककोंडी होऊ नये तसेच पोलिसांवर बंदोबस्ताचा अधिकचा ताण वाढू नये यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने शनिवारी आणि रविवारी मोठय़ा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आगमन सोहळा ठेवावा, अशी विनंती मंडळांना केली होती. त्या पार्श्वभूमीवर करी रोडमधील गणसंकुल आणि परळ वर्कशॉपमधील गणेश कार्यशाळांमधून मोठय़ा गणेशमूर्तींचा शनिवारी आणि रविवारी वाजतगाजत आगमन सोहळा पार पडला. आज सुमारे 130 मंडळांहून जास्त मंडळांच्या बाप्पांचे आगमन झाले. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

लहान मंडळांच्या बाप्पांचे 16, 17 सप्टेंबरला आगमन

मोठय़ा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे शनिवारी, रविवारी आगमन झाले तर अजूनही लहान मंडळांच्या बाप्पांचे आगमन झालेले नाही. या बाप्पांचे आगमन 16 आणि 17 सप्टेंबरला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर लालबाग-परळमधील गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये गर्दी होणार आहे. मात्र मोठय़ा मंडळांच्या तुलनेत या मंडळांची संख्या खूप असेल, अशी माहिती समन्वय समितीचे अमित कोकाटे यांनी दिली.

दोन दिवसांत या बाप्पांचे झाले आगमन

मालाडचा मोरेश्वर, खेतवाडीचा मोरया, गोरेगावचा श्री विघ्नहर्ता, गोरेगावचा महाराजा, गोरेगावचा मोरया, मालाडचा मोरया (कुरार व्हिलेज), दादरचा विघ्नहर्ता, अंधेरीचा विघ्नहर्ता, अंधेरीचा गणराज, वांद्रेचा सम्राट, दिव्याचा महाराजा, मालवणी म्हाडाचा राजा, मालवणीचा लाडका, कोकणचा राजा, कामराजचा राजा, शास्त्राrनगरचा महाराजा, दिव्याचा सम्राट, श्री जी मित्र मंडळ, गोलदेऊळचा राजा, इच्छापूर्ती श्री गणराज, साकीनाक्याचा विघ्नहर्ता, गोरेगावचा आराध्य, मुन्शी महलचा राजा, नायगावचा राजा, ताडदेवचा इच्छापूर्ती, फोर्टचा मोरेश्वर, परळचा सम्राट, धारावीचा गणराया, मानाचा राजा, गोरेगावचा राजा, कुलाब्याचा राजा, गिरगावचा गणराज, ऍण्टॉप हिलचा महाराजा, कुंभारवाडय़ाचा महाराजा, खार मुंबईचा स्वामी, खेतवाडीचा महाराजा, नवपाडय़ाचा राजा, पानबाजारचा राजा, खेतवाडीचा गणाधीश, ओम तांडव, कुलाब्याचा युवराज, परळचा विघ्नहर्ता, प्रतीक्षानगरचा राजा, कामाठीपुराचा इच्छापूर्ती, डायमंडचा राजा, कामाठीपुराचा महागणपती, परळचा लाडका, गणेशमूर्तीनगरचा महाराजा, सी.पी. टँकचा महाराजा, करी रोडचा राजा, अभ्युदयनगरचा गणराज, फोर्टचा महाराजा, करी रोडचा कैवारी, कुंभारवाडय़ाचा गणराज, मुलुंडचा महागणपती, मुंबईचा शाहू लंबोदर, मुंबईचा विघ्नहर्ता, खेतवाडीचा लंबोदर, मध्य भायखळय़ाचा राजा, साईनगरचा राजा, अंधेरीचा बाप्पा विघ्नहर्ता, उमरखाडीचा राजा, शिवशंभोचा विघ्नहर्ता, पी. पी. मार्गचा राजा, दक्षिण मुंबईचा राजा, जिजामातानगरचा राजा, भारतनगरचा राजा, मुंबईचा वक्रतुंड, बोरिवलीचा राजा, सोनेरी गार्डनचा राजा, डोंगरीचा राजा (दक्षिण मुंबईचा राजा), आंबेवाडीचा राजा यांच्यासह 130 मोठय़ा गणेशमूर्तींचे आगमन झाले.

दादरमध्ये खरेदीचा संडे धमाका

बाप्पाच्या आगमनासाठी होलसेल आणि किरकोळ साहित्यासाठी प्रसिद्ध असलेला दादर परिसर गर्दीने फुलला होता. रविवारी पाय ठेवता येणार नाही इतकी गर्दी उसळली होती. गर्दी नियंत्रणासाठी आणि चेंगराचेंगरी होऊन काही दुर्घटना होऊ नये यासाठी महापालिकेने दादर स्थानकाजवळ बसणाऱया फेरीवाल्यांवर कारवाई केली.