तुम्ही 50 वर्षे सत्ता भोगताय; मग दुसऱयाच्या कामावर मते का मागता? नगरकरांचा विखे-पाटील यांना सवाल

sujay-vikhe-patil

विखे-पाटील घराण्याने पन्नास वर्षे सत्ता भोगली आहे. मग स्वर्गीय दिलीप गांधी यांनी केलेल्या उड्डाणपुलाच्या कामावर तुम्ही मत का मागत आहात, असा सवाल नितीन भुतारे यांनी खासदार सुजय विखे यांना केला आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असून, या प्रचारात भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे-पाटील हे प्रत्येक ठिकाणी ‘मी उड्डाणपूल बांधला, आयुष हॉस्पिटल बांधले’, असे सांगून मते मागत आहेत. तसे पाहिले तर ही दोन्ही कामे स्वर्गीय खासदार दिलीप गांधी यांनी केली आहेत. या कामाच्या प्रस्तावापासून ते निविदा प्रक्रिया होईपर्यंत दिलीप गांधी हे पाठपुरावा करत होते. त्यांच्यामुळे उड्डाणपूल आणि आयुष हॉस्पिटल उभे राहिले, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते. तरीदेखील लोकांची दिशाभूल करून हे काम मीच केले, असे खासदार सुजय विखे सांगत आहेत.

विखे-पाटील घराण्याने पन्नास वर्षे नगर जिह्यात सत्ता भोगली; हे जनतेला माहीत आहे. मग स्वर्गीय दिलीप गांधी यांनी केलेल्या उड्डाणपुलाच्या कामावर तुम्ही मते का मागता, पन्नास वर्षे सत्ता भोगून विखे पाटील घराण्याने काय केले, असा सवाल युवानेते नितीन भुतारे यांनी केला आहे.