गुजराती सोसायटीत मराठी उमेदवाराच्या प्रचाराला मनाई; घाटकोपरमधील घटनेने सर्वत्र संताप

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुंबईत पाचव्या टप्प्यात मतदान होणार असून त्यासाठी शिवसेनेसह महाविकास आघाडीचे उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत. मात्र, घाटकोपरमध्ये रविवारी एका गुजरातीबहुल सोसायटीने उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारासाठी आलेल्या शिवसैनिकांना सोसायटीत प्रचारापासून रोखल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गिरगावमधील एका गुजराती पंपनीने दोन दिवसांपूर्वी नोकरीची जाहिरात देताना मराठी उमेदवारांनी नोकरीसाठी अर्ज करू नये, अशी जाहिरात प्रसिद्ध केली होती. यामुळे वातावरण तापले असताना आता घाटकोपरमध्ये गुजरातीबहुल सोसायटीने मराठी उमेदवाराच्या प्रचाराला मनाई केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. घाटकोपरचा परिसर उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार संजय दिना पाटील यांची थेट लढत भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्याशी होणार आहे.

परवानगी घेऊनच प्रचार 

शिवसैनिक रविवारी संध्याकाळी घाटकोपर पश्चिम भागात प्रचार करत होते. तेथील समर्पण नावाच्या सोसायटीत प्रचाराला जात असताना त्यांना सोसायटीत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. समर्पण सोसायटीतील रहिवाशांनी आम्ही मराठी माणसांना इमारतीत प्रचार करू देणार नाही असे सांगितले. आम्ही कायद्यानुसार परवानगी घेऊन प्रचार करत होतो, अशी माहिती शाखाप्रमुख प्रदीप मांडवकर यांनी दिली.

हे मराठी माणसांविरोधातील कारस्थान संजय राऊत

घाटकोपरच्या एका गुजराती सोसायटीत शिवसैनिकांना रोखण्यात आले. यावर शिवसेना व फडणवीस काय करतात हा प्रश्न आहे. हे मराठी माणसांविरोधात सुरू असलेले कटकारस्थान आहे. आम्ही यावर काय करायचे ते करू. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आव्हान स्वीकारले आहे, पण स्वतःला खरी शिवसेना म्हणवणारे यावर काय करतात ते पाहू, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला.