चिथावणीखोर भाषण भोवणार, नितेश राणे आणि गीता जैन विरुद्ध तक्रार दाखल

मुंबई जवळील मीरा रोड येथील हिंसाचारानंतर केलेल्या चिथावणीखोर भाषणप्रकरणी भाजप नेता नितेश राणे आणि स्थानिक आमदार गीता जैन यांच्याविरोधात राज्य सरकारने तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार केल्याची माहिती राज्य सरकारनेच मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.

विशेष सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं की, दोघांविरोधात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मीरा रोड वादाची सुरुवात अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाच्या आदल्या दिवशी झाली होती. काही समाजकंटकांनी शोभायात्रेवर दगडफेक केली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसंच, मीरा भाईंदर महापालिकेने बुलडोझरची कारवाई केली होती. मात्र, त्या दरम्यान काहींवर कारवाई न झाल्याने याचिका दाखल करण्यात आली होती.

मागील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने पोलीस आयुक्त आणि राज्याच्या महाधिवक्त्यांना नेत्यांच्या भाषणांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते. त्या तपासणीत दोन्ही नेत्यांमध्ये चिथावणीखोर भाषण केल्याचं निष्पन्न झालं. सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी मंगळवारी याची पुष्टी करत राणे आणि जैन यांची भाषणं चिथावणीखोर असल्याचं निष्पन्न झाल्याचं म्हटलं. राणेविरुद्ध मालवणी, मानखुर्द आणि घाटकोपर इथे रॅलीदरम्यान चिथावणीखोर भाषणं देण्याचा आरोप करण्यात आला आहे. तसंच, जैन यांच्यावर मीरा-भाईंदर येथे चिथावणीखोर भाषण दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध कलम 153 ए, 504 आणि 506 कलमअंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.