तुळजाभवानी मंदिरात गुढीपाडवा उत्साहात साजरा

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. गुढीपाडव्यानिमित्त पहाटे मंदिर शिखरावर गुढी उभारण्यात आली. तसेच देवीस हिरे जडित सुवर्णलंकार घालण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांची आराध्यदेवता, महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात मंगळवारी पहाटे चरणतीर्थ प्रारंभ झाल्यानंतर चैत्री गुढीपाडव्यानिमित्त प्रति वर्षाप्रमाणे पारंपारिक पद्धतीने मंदिर शिखरावर पहाटे तुळजाभवानी देवीचे मंहत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा यांच्या हस्ते मंदिर शिखरावर विधीवत पूजा करून मोठ्या भक्ती भावाने गुढी उभारण्यात आली. यावेळी तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक सोमनाथ माळी, मंदिर संस्थांचे धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी गुढीचे विधिवत पूजन, आरती करून नैवेद्य दाखविण्यात आला. यानंतर तुळजाभवानी मातेचे दैनंदिन पंचामृत अभिषेक सुरू झाले. अभिषेक पूजा संपताच तुळजाभवानीची विशेष एक नंबर दागिने अलंकार महापूजा मांडली. या पूजेत तुळजाभवानीस विविध प्रकारचे हिरे जडित सुवर्णलंकार घालण्यात आले होते.

गुढीपाडव्यानिमित्त तुळजाभवानीच्या मुख्य गाभार्‍यात विविध फुलांनी आकर्षक सुंदर सजावट केली होती. यानंतर नित्योपचार धुपारती, अंगारा नैवेद्य हे विधी पार पडले. यावेळी पुजारी भाविक भक्त आणि मंदिर कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.