गीताबोध – अवलोकन…

>> गुरुनाथ तेंडुलकर

कुरुक्षेत्रातील रणांगणात युद्धासाठी कोण कोण योद्धे आले आहेत हे जाणून घेण्यासाठी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला  सेनयो उभयोः मध्ये रथम् स्थापय मे अच्युत’’  (दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा कर) अशी आज्ञा दिली.

या ठिकाणी भगवान व्यासांनी अर्जुनाच्या तोंडी  श्रीकृष्णाला उद्देशून ‘अच्युत’ हे संबोधन वापरलं आहे. भगवद्गीतेमध्ये व्यासांनी श्रीकृष्णाला वेगवेगळ्या नावांनी संबोधित केलं आहे. कधी त्याला ‘कृष्ण’ म्हटलं आहे, तर कधी ‘मधुसूदन’ म्हटलं आहे. कधी त्याला ‘गोविंद’, अशी हाक मारली आहे, तर कधी त्याला ‘हृषीकेश’ असं म्हटलं आहे. कधी ‘माधव’ म्हटलं आहे, तर कधी ‘प्रभू’ नावाने साद घातली आहे. या प्रत्येक नावाला एक विशिष्ट अर्थ आहे. या प्रत्येक नावाचा अर्थ आणि त्यामागची कथा हा वेगळ्या ग्रंथाचा विषय होऊ शकेल, पण इथे पहिल्या अध्यायातील एकविसाव्या श्लोकात अर्जुनाने श्रीकृष्णाला ‘अच्युत’ या नावाने संबोधित केलं आहे.

‘अच्युत’ या शब्दाचा अर्थ जाणून घेऊ या. ‘च्यु’ म्हणजे ढळणे, पडणे. आपण मराठीत अनेकदा ‘पदच्युत’ हा शब्द वापरतो. एखाद्या पदावरून किंवा स्थानावरून खाली उतरण्याला पदच्युत असं म्हणतात.

‘अच्युत’ म्हणजे न ढळणारा. अढळ. न चवति, न चविष्यति म्हणजेच जो स्वत कधी पडत नाही आणि आपल्या भक्ताला कधीही पडू देत नाही तो अच्युत. थोडं विस्ताराने सांगायचं तर भगवान श्रीकृष्णाचं ‘अच्युत’ हे नाव भगवद्गीतेत तीनवेळा आलं आहे. अर्थ एकच असला तरी तीनही ठिकाणी त्याचा संदर्भ वेगवेगळा आहे. असो.

संजय उवाच,

एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।

सेनयोः उभयोः मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ।। 24 ।।

भीष्म द्रोण प्रमुखत सर्वेषाम् च महीक्षिताम् ।

उवाच पार्थ पश्य एतान् समवेतान् कुरुन् इति ।। 25 ।।

तत्र अपश्यत स्थितान् पार्थः पितृन् अथ पितामहान् ।

आचार्यान् मातुलान् भ्रातृन् पुत्रान पौत्रान् सखीन तथा ।। 26 ।।

श्वशुरान् सुहृद च एव सेनयोः उभयोः अपि ।

तान् समीक्ष कौंतेय सर्वान् बंधून् अवस्थितान् ।। 27 ।।

कृपया परया आविष्ट विषीदन् इदम अब्रवीत ।

अर्जुन उवाच,

दृष्टेव स्वजनं कृष्ण युयुत्सु समुपस्थितम् ।। 28 ।।

भावार्थ ः अर्जुनाच्या आज्ञेबरहुकूम भगवान श्रीकृष्णाने रथ सैन्याच्या मधोमध नेऊन उभा केला. अशा ठिकाणी रथ नेला की, जिथून भीष्माचार्य, द्रोणाचार्य आणि इतर महत्त्वाचे राजेमहाराजे दिसतील. रथ थांबवून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “हे अर्जुना, युद्धासाठी सज्ज झालेल्या या सर्वजणांचं नीट अवलोकन कर. भगवद्गीतेत व्यासांनी ‘पश्य’ हा शब्द वापरला आहे. केवळ बघ नाही, तर नीट विचारपूर्वक अवलोकन कर.’’ इंग्रजीत ‘See’ आणि ‘Observe’ हे दोन्ही शब्द भिन्न अर्थाने वापरले जातात. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धसज्ज सैन्यातील महत्त्वाच्या योद्धय़ांना विचारपूर्वक-जाणीवपूर्वक बघायला सांगितलं आहे.

आपल्याही दैनंदिन आयुष्यात अनेक घटना घडतात. आपण दररोज अनेक माणसं बघतो. दुकानं पाहतो. टीव्हीवरचे कार्यक्रम बघतो, अनेक मेसेज वाचतो. फेसबुकवरच्या पोस्ट बघतो. लोकांचे स्टेटस बघतो. ते बघणं केवळ वरवरचं असतं. डोळ्यांना दिसतं, पण मनापर्यंत मात्र काहीच पोहोचत नाही. अंतकरणात भिनत नाही. अशा वरवरच्या बघण्याचे परिणाम केवळ क्षणिक असतात. अनेक शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा परीक्षेपुरता केलेला अभ्यास हा असाच वरवरचा असतो. परीक्षेनंतर दोन महिन्यांनी तोच पेपर त्यांना पुन्हा सोडवायला सांगितला तर कितीजणांना सोडवता येईल हे सांगता येणार नाही.

इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, “नीट बघ. सजगपणे बघ. विचारपूर्वक अवलोकन कर.’’ अर्जुनाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्ण आपल्यालाही हेच सांगतात, “जे बघता, ते नीट बघा, जे काही करता, ते नीट करा. मनापासून करा. अंतकरणपूर्वक करा. केवळ वरवरची क्रिया नको. ती जाणीवपूर्वक केलेली क्रीडा होऊ दे.’’ ‘क्रिया’ आणि ‘क्रीडा’ या शब्दांतील भेद ध्यानात घ्या. क्रिया या अनेकदा मनाविरुद्ध कराव्या लागतात. तीच क्रिया मन लावून केली की, ती क्रीडा होते. भगवान श्रीकृष्णाच्या अभ्यास केला तर त्याला कोणतंही ठिकाण हे क्रीडांगणच होतं. अगदी रणांगणदेखील त्याच्या दृष्टीने क्रीडांगणच होतं. ते प्रत्येक युद्ध एखादा खेळ खेळावा तशा भावनेने खेळले आणि जिंकले. असो.

अर्जुनाने पाहिलं. समोर साक्षात पितामह भीष्माचार्य, गुरू द्रोणाचार्य, दुर्योधन-दुःशासन यांसारखे चुलतभाऊ, इथे आपल्या सैन्यात उपस्थित आपले सख्खे भाऊ, मुलगे, मित्र, सासरे, मेव्हणे, सर्व आप्तेष्ट आणि हितचिंतक… दोन्ही पक्षांतील लोक ओळखीचे. सगळे जण आपले… स्वजन…

त्या सर्व स्वजन बांधवांना पाहून अर्जुनाच्या मनात संभ्रम निर्माण झाला. त्याचं मन करुणेने भरून गेलं. अत्यंत शोकाकुल अवस्थेत तो भगवान श्रीकृष्णाला म्हणाला,

अर्जुनाची ही संभ्रमित अवस्था आज आपणही सर्वजण अनुभवत आहोत. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. कोण कोणत्या पक्षात होता आणि आता कुठे गेला हे समजत नाही. आज या पक्षात असलेला नेता उद्या नेमका कोणत्या पक्षात असेल हे कोणीच सांगू शकत नाही. वडील सत्ताधारी पक्षात आणि मुलगा विरोधी पक्षात असंही दृष्य पाहायला मिळतंय. मागच्या वेळी प्रखर विरोध करणारे नेते या खेपेला बिनशर्त पाठिंबा देताना दिसताहेत. अशा वेळी कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या मनात प्रचंड गोंधळ उडालेला आहे. एकंदरीत आपल्या सगळ्यांचा अर्जुन झालेला आहे.

बघू या, पुढे काय होतंय ते…

।। श्री कृष्णार्पणमस्तु ।।

n [email protected]