गीताबोध – हम भी कुछ कम नही

>> गुरुनाथ तेंडुलकर

मागील लेखात आपण दुर्योधनाने आचार्य द्रोणाचार्यांना पांडवांच्या बाजूने लढणाऱ्या सेनेतील प्रमुख वीर कोण कोण आहेत हे सांगून कोणत्याही प्रकारची माया-ममता न बाळगता शत्रुसैन्याचा नि:पात करण्याविषयी सूचना जाणून घेतली.

आता पुढील श्लोकांत दुर्योधन आचार्यांना स्वत:च्या सेनेतील शूरवीर योद्धे कोण कोण आहेत यासंबंधी सांगतोय…

अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम ।

नायका मम सैन्यस्य संज्ञाथर तान्ब्रवीमि ते ।।7।।

भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समिनिन जय… ।

अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्ति तथैव च ।।8।।

अन्ये च बहव… शूरा मदर्थे त्य3तजीविता… ।

नाना शस्त्रप्रहरणा… सर्वे युद्ध विशारदा… ।।9।।

अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम ।

प्रयाप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरश्रितम2।।10।।

अयनोषु च सर्वेषु यथाभागम अवस्थिता… ।

भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्त… सर्व एव हि ।।11।।

भावार्थ … हे ब्राह्मणश्रेष्ठ आचार्य, आता मी आपल्या सैन्यातील जे प्रमुख आहेत त्यांच्याबद्दल आपणास सांगतो.

आपण स्वत: तसेच भीष्माचार्य, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण तसेच सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा यांच्यासारखे अनेक जण माझ्यासाठी जीवावर उदार होऊन युद्धाला सज्ज आहेत. ते सर्वजण निरनिराळ्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात निपुण आहेत. आपल्या या विराट सैन्याचे सेनापती असणाऱ्या भीष्म पितामहांनी स्वत: योजनाबद्ध व्यूहरचना केली आहे. आपले हे सैन्यदल अमर्याद शक्ती असणारे आहे. त्या मानाने भीमाच्या अधिपत्याखालील पांडवांचे सैन्य संख्येनेही कमी असून जिंकायलादेखील सोपे आहे. म्हणून आपण स्वत: विजयाबद्दल कोणताही संदेह मनात न बाळगता आपल्या सैन्याचे रक्षण करावे. त्याचप्रमाणे शत्रुसैन्याचा समाचार घ्यावा.

या श्लोकांवर भाष्य करताना ज्ञानेश्वर माऊलींनी ‘ज्ञानेश्वरी’मध्ये उल्लेखिलेल्या काही ओव्या पहा…

जया जिया अक्षोहिणी । तेणें तिया आयणी ।

वरगण कवणकवणी । महारथियां ।। 22 ।।

तेणें तिया आवरिजे । भीष्मातळी राहिजे ।

द्रोणाते म्हणे परिसिजे । तुम्ही सकळीं ।। 23 ।।

हाचि एकु रक्षावा । मी तैसा देखावा ।

येणे दळभारु आधवा । साचु आमुचा ।। 24 ।।

भावार्थ… सैनिकांना आणि द्रोणाचार्यांना उद्देशून दुर्योधन पुन्हा सांगतोय की, प्रत्येकाने आपापल्या सैन्याच्या जितक्या अक्षौहिणी तुकडय़ा असतील, त्यांनी त्यांच्या रक्षणाकरिता ज्या कोणा महारथची जशी वाटणी केली असेल त्याप्रमाणे सैन्याचा संचार करावा आणि भीष्मांच्या आज्ञेत वागावे. तुम्ही सर्वांनी मिळून भीष्म पितामहांचे रक्षण करावे. हे भीष्माचार्य म्हणजे जणू मी स्वत: आहे असं समजून तुम्ही त्यांना माझ्याप्रमाणे वागवावे, त्यांचा योग्य तो उचित सन्मान करावा. आपल्या सैन्याची संपूर्ण बळकटी त्याच्यावर अवलंबून आहे.

या पाच श्लोकांतून पुन्हा एकदा दुर्योधनाची मानसिकता प्रकट होते. त्याचा कुणावरच धडपणे विश्वास नाही. ना गुरू द्रोणाचार्यांवर, ना पितामह भीष्माचार्यांवर. युद्धाच्या आरंभीच त्याचं मन शंकित झालेलं आहे. अर्जुन हा द्रोणाचार्यांचा लाडका शिष्य आहे. त्यामुळे त्यांचा ओढा पांडवांच्या बाजूने तर नाही ना? ही शंका त्याचबरोबर भीष्माचार्यदेखील मनातून पांडवांच्याच बाजूने आहेत. तसं नसतं तर त्यांना वंदन करण्यासाठी आलेल्या पांडवांना त्यांनी ‘विजयी भव’ असा आशीर्वाद दिला नसता. शिवाय आपलं सैन्य. या सैन्यामध्ये अनेक शूरवीर यादव सैनिक आहेत, पण त्या सर्व यादवांचा स्वामी असणारा यदुनंदन कृष्ण. तो मात्र पांडवांच्या सैन्यात. खरंच आपण विजयी होऊ का? की आपल्याच सैन्यातील हे अतीरथी महारथी, आपल्याला दगाफटका करतील? दुर्योधन भयशंकेनं ग्रासलाय. म्हणूनच तो आम्ही कमी पडणार नाही असं पुन: पुन्हा गुरू द्रोणाचार्यांना सांगतोय.

त्याचबरोबर तो आपल्या सैन्यात असणाऱ्या अश्वत्थाम्याची आणि कृपाचार्यांची आठवण करून देतोय. जणू त्याला सांगायचं आहे की, हे आचार्य, जर आपण पांडवांच्या विरोधात युद्ध करताना थोडी जरी दयामाया दाखवलीत तर ते आपलाच पुत्र अश्वत्थाम्याच्या आणि आपल्या पत्नीचे बंधू कृपाचार्य यांच्या जीवावरदेखील बेतू शकते. तेव्हा युद्ध करताना पांडव आपले वैरी आहेत हे सतत ध्यानात ठेवा.

द्रोणाचार्यांना युद्धाची सूचना देऊन दुर्योधनाने पितामह भीष्माचार्यांकडे दृष्टिक्षेप टाकला. भीष्माचार्यांना पांडवांबद्दल प्रेम असलं तरी तरी ते कुरुकुलाशी एकनिष्ठ राहतील याबद्दल दुर्योधनाला बऱ्याच अंशी खात्री होती.

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।