गीताबोध – शंखनाद

>> गृरुनाथ तेंडुलकर

मागील 11 श्लोकांत आपण कौरव व पांडवांच्या सेनेतील प्रमुख योद्धे कोण कोण आहेत याचा थोडाफार आढावा घेतला. पांडवांच्या सैन्याच्या तुलनेत कौरवांचे सैन्य हे अफाट होते. पांडवांच्या सैन्याचा सेनापती भीम होता, तर कौरवांच्या सैन्याचे सेनापती होते स्वत भीष्माचार्य. अनेक युद्धांचा अनुभव असलेले केवळ वयाने नव्हे तर अनुभवाने, ज्ञानाने आणि सन्मानाने ज्येष्ठ-श्रेष्ठ. दुर्योधनाला त्यांच्या कुरुकुलाच्या निष्ठेबद्दल खात्री होती म्हणूनच त्याने मोठय़ा अपेक्षेने भीष्याचार्यांकडे दृष्टिक्षेप टाकला.

तस्य संजनयन्हर्षं कुरुवृद्ध पितामह 

सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान् ।। 12 ।। 

तत शंखाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः 

सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलो भवत् ।। 13 ।। 

ततश्वेँतैर्हयैर्युकत्ते महति स्यंदने स्थितौ 

माधव पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्ततुः ।। 14 ।। 

पांचजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनंजय 

पौंड्रं दध्मौ महाशंखं भीमकर्मा वृकोदर ।। 15 ।। 

अनंतविजयं राज कुंतिपुत्रौ युधिष्ठिर 

नकुल सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ ।। 16 ।। 

भावार्थ : कौरव सैन्यातील वृद्ध महापरामी पितामह भीष्माचार्यांनी दुर्योधनाच्या अंतकरणात आनंद निर्माण करण्याच्या हेतूने सिंहासारखी गर्जना करून आपला शंख फुंकला. त्यानंतर कौरव सैन्यात शंख, नगारे, ढोल, मृदुंग, शिंगे इत्यादी सर्व रणवाद्ये एकत्रितपणे वाजू लागली आणि त्यांचा प्रचंड ध्वनी निनादू लागला. या ध्वनीला उत्तर म्हणून भगवान श्रीकृष्णांनी आणि ते सारथ्य करीत असलेल्या रथातील अर्जुनाने आपापले शंख फुंकले. त्यापाठोपाठ ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर म्हणजेच धर्मराज, तसेच भीम आणि नकुल-सहदेवांनीही आपापले शंख फुंकले. भगवान श्रीकृष्णांच्या शंखाचं नाव होतं पांचजन्य, अर्जुनाच्या शंखाचं नाव होतं देवदत्त, धर्मराज युधिष्ठिराच्या शंखाचं नाव होतं अनंतविजय, भीमाच्या शंखाचं नाव होतं पौंड्र, नकुलाच्या शंखाचं नाव सुघोष आणि सहदेवाच्या शंखाचं नाव होतं मणिपुष्पक.

त्याकाळातील प्रत्येक शंखाला एक विशिष्ठ नाव होतं. त्या नावामागे काहीतरी विशिष्ट हेतू आणि एक कथा होती. (यासंबंधी नंतर कधीतरी सांगेन.)

काशस्य परमेश्वास शिखंडी च महारथ 

धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकि च अपराजित ।। 17 ।। 

द्रुपदो द्रौपदायाश्च सर्वश पृथ्विवीपते 

सौभद्रश्च महाबाहुः शंखान् दधध्मुः पृथक् पृथक् ।। 18 ।। 

स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् 

नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् ।। 19 ।।

भावार्थ : त्यानंतर श्रेष्ठ धनुर्धर काशिराज, द्रौपदीचा भाऊ शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट राजा, सात्यकी, राजा दृपद, द्रौपदीचे पाचही मुलगे, सुभद्रापुत्र अभिमन्यू या सर्वांनी आपापले शंख वाजवले. त्या शंखांच्या एकत्रित अशा भयंकर आवाजाने आकाश आणि पृथ्वीला व्यापणारा ध्वनी ऐकून कौरव सैन्यातील अनेकांच्या छातीत धडकी बसली.

पूर्वी युद्ध ही रणांगणावर होत असत. तिथे युद्धाचे काही नियम असत. त्या नियमाबरहुकूम युद्धं केली जात. सूर्योदयानंतर युद्धाला आरंभ होऊन सूर्यास्ताला युद्धविराम होत असे. अलीकडच्या युद्धांप्रमाणे त्याकाळी दिवसा-रात्री केव्हाही हल्ले केले जात नसत. अलीकडे आपण पाहतो युद्धात सरसकट बाँबहल्ले केले जातात. त्यात अनेकदा तर निरपराध माणसं मारली जातात. अतिरेकी तर निरपराध नागरिकांचा बळी घेतात. सध्या सुरू असलेल्या हमास विरुद्ध इस्रायल युद्धात हमास अतिरेक्यांनी सुरुवातीला इस्रायलच्या हद्दीत शिरून निरपराध नागरिकांची हत्या केली. अनेक स्त्रियांना आणि लहान मुलांना जबरदस्तीने ओलीस म्हणून पळवून नेले. त्यानंतर इस्रायलने हमासच्या अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी तुफान हल्ले केले. त्यात अनेक इमारती कोसळल्या. जीवित हानी झाली. रशिया-पोनच्या युद्धामध्ये हाच प्रकार सुरू आहे.

पण रामायण-महाभारत काळात असले प्रकार होत नव्हते. म्हणून त्या युद्धाला ‘धर्मयुद्ध’ असे संबोधले जात असे. याच धर्मयुद्धाचा एक भाग होता शंखनाद.

या शंखनादामागे दोन हेतू होते. पहिला म्हणजे आपल्या सैन्यातील सैनिकांमध्ये वीरश्री निर्माण करणे आणि शत्रूच्या हृदयात धडकी भरवणे.

त्याचबरोबर आणखीही एक हेतू या शंखनादामागे होता. तो म्हणजे युद्धभूमीतून अखेरच्या क्षणीदेखील कुणाला भीती वाटत असेल आणि त्याला तिथून निघून जायचे असेल तर त्यांना अखेरची संधी देण्यासाठी हा शंख नाद केला जात असे.

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।

[email protected]