पाऊस थांबेना! आजही मुसळधार

मुंबईत पावसाचा जोर कायम असून आज मुंबईसह राज्यातील अनेक भागांना पावसाने झोडपून काढले. उद्या 28 जुलै रोजीदेखील काही भागात अतिजोरदार पाऊस होणार असल्याने हवामान खात्याने मुंबईसाठी खबरदारीचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. मुसळधारच्या इशाऱ्यामुळे पालिकेनेही आपली संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली असून मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हवामान विभागाने आज गुरुवारसाठी दिलेल्या ‘रेड अलर्ट’नुसार पावसाने मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगराला झोडपून काढले. पावसाच्या इशाऱ्यामुळे पालिकेने सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली होती. दिवसभर पावसाने संततधार सुरूच ठेवल्याने रस्ते, रेल्वे वाहतूक मंदावली होती. तर पावसामुळे खड्डेमय रस्त्यांवर  ट्रफिक जाम झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचले. कुर्ला, मानखुर्द, चेंबूर शेल कॉलनी, सायन गांधी मार्केट, किंग्ज सर्कल, माटुंगा, भांडुप, अंधेरी सबवे, मालाड, कुलाबा, मरीन लाईन्स, चर्चगेट आदी सखल भागात पाणी साचले. चर्चगेट येथे रेल्वे स्थानक परिसरात गुडघाभर पाणी साचले होते. पालिकेने येथे पंपाच्या साहाय्याने पाण्याचा उपसा करून पाण्याचा निचरा केला.

26 झाडे-फांद्या कोसळल्या

मुंबईत जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे 26 ठिकाणी झाडे-फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. तर एका ठिकाणी घराची भिंत कोसळल्याची घटना घडली आणि 24 ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनांमध्ये कुणीही जखमी झाले नाही.

म्हणूनच यलो अलर्ट

हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार आपत्कालीन स्थिती उद्भवण्याच्या शक्यतेमुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी ‘रेड अलर्ट’ दिला जातो. तर ‘ऑरेंज अलर्ट’मध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकते तर ‘यलो अलर्ट’मध्ये मोठा धोका नसला तरी खबरदारी घेण्याची गरज असते अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात येतात.

दहिसरमध्ये सर्वाधिक पाऊस

  • सांताक्रुझः 75.8 मिमी
  • कुलाबाः 85.8 मिमी
  • वांद्रेः    68.8 मिमी
  • दहिसरः 159. 5 मिमी
  • राम मंदिरः       82. मिमी
  • चेंबूरः   60.5 मिमी
  • सीएसएमटीः     83.5 मिमी
  • माटुंगाः 69 मिमी

आजचा एकूण पाऊस

  • मुंबई शहरः       83.23 मिमी
  • पूर्व उपनगरः     95.01 मिमी
  • पश्चिम उपनगरः        62.27 मिमी