मणिशंकर अय्यर यांच्या मुलीच्या संस्थेविरोधात कारवाई

केंद्रीय गृहमंत्रालयाने काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची कन्या यामिनी अय्यर यांची प्रसिद्ध संस्था थिंक टँक सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (CPR) चा विदेशी योगदान नियमन कायद्याअंतर्गत दिला जाणारा परवाना रद्द केला आहे. ही संस्था नियमांचे उल्लंघन करत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचा एफसीआरए परवाना रद्द करण्यात आला आहे. यामिनी अय्यर यांची ही संस्था पूर्वीपासून गृहमंत्रालयाचा रडारवर होती. यामुळे या संस्थेची आयकर विभागाने तपासणी केली होती.

थिंक टँक सीपीआरला फोर्ड फाऊंडेशनसहीत अनेक परदेशी संघटनांकडून अर्थसहाय्य करण्यात आले होते. यामिनी अय्यर यांच्या या संस्थेपेने सामाजिक कार्यकर्त्या टिस्टा सेटलवाड यांच्या सामाजिक संस्थेला अर्थसहाय्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. 2016 साली टिस्टा यांची सामाजिक संस्था सबरंग याचा एफसीआरए परवाना रद्द केला होता. यापूर्वी यामिनी अय्यर यांच्या संस्थेचा परवाना ६ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला होता. हे निलंबन पुन्हा सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आले होते. यामुळे यामिनी अय्यर यांच्या संस्थेने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र आता हा परवाना रद्द करण्यात आला आहे.

सेंटर फॉर पॉलिसी ही एक शोध संस्था असून 21 व्या शतकातील आव्हानांचा मुकाबला कसा करावा यावर ती अभ्यास करत असते. या संस्थेमध्ये विविध विचारवंत आणि धोरण ठरवणारी मंडळी एकत्र येतात आणि धोरणे कशी असावीत यावर उहापोह करून त्यासंदर्भात अहवाल तयार करत असतात.