सातारला दोन खासदार हवे असतील तर शशिकांत शिंदे यांनाच विजयी करा!

‘उदयनराजे भोसले हे सध्या राज्यसभा खासदार आहेतच. त्यामुळे आता निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना भरघोस मतांनी विजयी करा, म्हणजे साताऱयाला दोन खासदार मिळतील आणि साताऱयाचा चौफेर विकास होईल,’ अशा मार्मिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी साताऱयातील जनतेला साद घातली. याला मतदारांकडून जोरदार दाद मिळाली.

सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ जावली तालुक्यातील केळघर येथे आयोजित सभेत जयंत पाटील बोलत होते. याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, डॉ. भारत पाटणकर, सदाशिव सपकाळ, दीपक पवार, सारंग पाटील, बापूराव पार्टे, पार्टे गुरुजी, विश्वनाथ धनवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, ‘या देशात हुकूमशाही प्रवृत्ती बळकट होत असून, या देशातील नागरिकांचे अधिकार संकुचित होतील की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. याविरोधात आवाज उठवणाऱयांना तुरुंगात टाकले जात आहे. याला आळा घालण्याच्या निर्धाराने सर्वसामान्य जनतेनेच आता ही निवडणूक हातात घेतली आहे,’ असे त्यांनी सांगितले.

आज देशात स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल, देशातील वंचित व दीनदलित लोकांचा आवाज जपायचा असेल, तर विरोधी पक्षांचा आवाज बुलंद केला पाहिजे, तरच देशात लोकशाही टिकेल. देशातील जनता ही महागाई, बेरोजगारी, विविध करांच्या जाचाने त्रस्त आहे. युवकांना बेरोजगार केले जात आहे. त्यामुळे केंद्रातील निक्रिय सरकार घालविण्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करून लोकशाही बळकट करूयात, असे आवाहन जयंत पाटील यांनी उपस्थितांना केले.

सभेस संतोष चव्हाण, नितीन गोळे, सुहास गिरी, मोहनदादा शिंदे, हेमंत शिंदे, समिंद्राताई जाधव, अतिश कदम, रूपाली भिसे, सुरेश गोळे, विठ्ठल गोळे तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

पाल येथून प्रचाराचा शुभारंभ

शशिकांत शिंदे यांच्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रचाराचा शुभारंभ पाल (श्री खंडोबाची) येथे आमदार बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. याप्रसंगी डॉ. भारत पाटणकर, डॉ. सुरेश जाधव, ऍड. रवींद्र पवार, राजेंद्र शेलार, अजितराव पाटील-चिखलीकर, जयवंत पाटील, मानसिंगराव जगदाळे, देवराजदादा पाटील, हर्षद कदम, सारंग पाटील, संजय देशपांडे, कांतीलाल पाटील, शहाजीराव क्षीरसागर, प्रणव ताटे उपस्थित होते.