‘मी व्हिस्कीचा चाहता’; सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टरूममध्ये ‘रंगला’ संवाद

supreme-court

न्यायालयात युक्तीवादांमुळे होणारी गरमागरम चर्चा नेहमीच पाहायला मिळते. पण काही वेळा न्यायाधीश आणि वकिलांमध्ये हलकाफुलका संवादही अनुभवायला मिळतो. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी असाच एक हलकाफुलका संवाद रंगला. एका खटल्यादरम्यान सुरू असलेल्या युक्तीवादावेळी ज्येष्ठ वकील दिनेश द्विवेदी आणि देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यात काही काळ हलकाफुलका संवाद पाहायला मिळाला.

द्विवेदी यांनी गंमतीत आपल्या विविध रंगात रंगलेल्या केसांवर भाष्य केलं. ‘रंगरंगोटी केल्यासारख्या दिसणाऱ्या केसांबद्दल मी माफी मागतो’, असं म्हणत, ‘हे होळीमुळे झालं आहे. आजूबाजूला बरीच मुलं आणि नातवंडे असण्यानं अशी अडचण होते. तुम्ही त्यांच्यापासून बचाव करू शकत नाही’.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हाच धागा पकडत विनोदीढंगात पुढला प्रश्न केला. ‘दारूचा काही संबंध नाही?’. सरन्यायाधिशांनी असा सवाल करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

द्विवेदी यांनीही हसतंच उत्तर दिलं की, ‘हो तसंही आहे. कारण होळी म्हणजे थोडा मद्याच संबंध आलाच… आणि मी कबूल केलेच पाहिजं… मी व्हिस्कीचा चाहता आहे’. त्यावर पुन्हा एकदा कोर्टात हशा पिकला.

नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर औद्योगिक अल्कोहोल प्रकरणी सुनावणी सुरू होती. औद्योगिक अल्कोहोल हे बाजारात उपलब्ध असलेल्या खाद्य अल्कोहोलसारखेच आहे का आणि औद्योगिक अल्कोहोल उत्पादनावर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील अधिकारांवर खंडपीठाने चर्चा केली.

उत्तर प्रदेश राज्याकडून उपस्थित राहिलेल्या द्विवेदी यांनी असा युक्तिवाद केला की सर्व प्रकारची दारू राज्याच्या नियंत्रणाखाली येते.