West Indies Vs India – वेस्ट इंडीजचा 200 धावांनी धुव्वा, टीम इंडियाने मालिका 2-1 ने जिंकली

हिंदुस्थानी क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजच्या संघाला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सहजपणे पराभूत करत मालिका आपल्या खिशात घातली. हिंदुस्थानी संघाने ही मालिका 2-1 असा फरकाने जिंकली आहे. हिंदुस्थानी संघाने पहिले फलंदाजी करताना 50 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 351 धावा चोपून काढल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करणारा वेस्ट इंडीज संघ अवघ्या 151 धावांत बाद झाला. वेस्ट इंडीजचा डाव 35.3 षटकांतच आटोपला. या सामन्यात 92 चेंडूत 85 धावा करणाऱ्या शुभमन गिल याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला तर इशान किशन याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

दुसऱया सामन्यातील निराशाजनक कामगिरीनंतर हिंदुस्थानने इशान किशन (77), शुभमन गिल (85), संजू सॅमसन (51), हार्दिक पंडय़ा (नाबाद 70) यांच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर ब्रायन लारा स्टेडियमवर 50 षटकांत 5 बाद 351 असा धावांचा पाऊस पाडला.

वेस्ट इंडीजने आज नाणेफेक जिंकून हिंदुस्थानला फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि इशान किशन आणि शुभमन गिल या युवा धडाकेबाजांनी 19.4 षटकांत 143 धावांची सलामी देत संघाला मोठय़ा धावसंख्येचा पाया रचून दिला. त्यानंतर शुभमनने संजू सॅमसनबरोबर तिसऱया विकेटसाठी 69 धावांची भागी रचली. मग सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंडय़ाने पाचव्या विकेटसाठी 55 धावांची भर घातली. सर्वात शेवटी पंडय़ा-जाडेजाने 19 चेंडूंत 42 धावा चोपून काढत हिंदुस्थानला 351 पर्यंत नेले. आज हिंदुस्थानी फलंदाजांनी 28 चौकार आणि 14 षटकार ठोकले.

17 वर्षांपासून वन डेत विंडीजविरुद्ध अजेय

हिंदुस्थान-वेस्ट इंडीजदरम्यान झालेला तिसरा व निर्णायक एकदिवसीय क्रिकेट सामना टीम इंडियाने जिंकत विंडीजविरुद्ध सलग 13 वी एकदिवसीय मालिका जिंकून नवा विक्रम केला आहे. हिंदुस्थान-वेस्ट इंडीजदरम्यान पहिली एकदिवसीय क्रिकेट मालिका मार्च 1983 मध्ये झाली होती. त्यावेळी विंडीजने ही मालिका 2-1 फरकाने जिंकली होती. त्यानंतर 1989 पर्यंत कॅरेबियन संघाने सलग पाच एकदिवसीय मालिकेत हिंदुस्थानला हरविले होते. मग 1994 मध्ये हिंदुस्थानने पहिल्यांदा वेस्ट इंडीजला एकदिवसीय मालिकेत हरविले. घरच्या मैदानावर हिंदुस्थानने 4-1 फरकाने बाजी मारली होती. त्यानंतर जय-पराजयाचा खेळ सुरू राहिला, वेस्ट इंडीजने 2006 मध्ये हिंदुस्थानविरुद्ध अखेरची एकदिवसीय मालिका जिंकली होती. त्यानंतर हिंदुस्थानने या कॅरेबियन संघाला सलग 12 एकदिवसीय मालिकेत लोळविण्याचा पराक्रम केलाय.