IND vs ENG – ‘स्पिनबॉल’ पुढे ‘बॅझबॉल’चं लोटांगण, इंग्लंडचा डाव 246 धावात आटोपला

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. पहिल्याच दिवशी इंग्लंडचे ‘बॅझबॉल’ क्रिकेट आणि हिंदुस्थानच्या फिरकी गोलंदाजीत सामना रंगला. यात हिंदुस्थानने बाजी मारत इंग्लंडचा संपूर्ण डाव 246 धावांमध्ये गुंडाळला. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 70 धावा केल्या.

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. जॅक क्राऊली आणि डकेट यांनी इंग्लंडला अर्धशतकीय सलामी दिली. मात्र यानंतर अश्विन, जडेजा आणि अक्षर पटेल या फिरकीच्या तिकडीने इंग्लंडच्या फलंदाजांना वेसन घालत त्यांना आपल्या तालावर नाचण्यास भाग पाडले. त्यामुळे बिनबाद 55 वरून इंग्लंडची अवस्था डाव 7 बाद 155 अशी झाली.

समोरून एकामागोमाग एक फलंदाज बाद होत असताना बेन स्टोक्सने मात्र एक बाजू लावून धरली आणि तळाच्या फलंदाजांना हाताशी धरत इंग्लंडला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला. अखेरच्या तीन खेळाडूंनी 91 धावा करत इंग्लंडला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. बेन स्टोक्सने सर्वाधिक 70 धावा केल्या. हिंदुस्थानकडून आर अश्विन आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी 3, तर अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.