कारूआना-गुकेश; प्रज्ञानंद-नाकामुरा भिडणार

रशियाच्या इयान नेपोमनियाच्ची याच्यासह संयुक्तपणे आघाडीवर असलेला हिंदुस्थानचा डी. गुकेश कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत 11 व्या फेरीत अमेरिकेच्या अव्वल मानांकित फॅबियानो करूआना यांच्याशी भिडणार आहे. दुसरीकडे आर. प्रज्ञानंदची गाठ अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा याच्याशी पडेल. आता स्पर्धेतील केवळ चार फेऱया शिल्लक असून गुकेश व प्रज्ञानंद यांना चांगली संधी आहे. विदित गुजरातीनेही स्पर्धेत स्वतःला टिकवून ठेवले आहे, पण त्याला कामगिरी उंचवावी लागणार आहे. या स्पर्धेत इयान नेपोमनियाच्ची या एकमेव अजेय खेळाडू आहे, मात्र त्याला आगामी फेरीत विदितचे कडवे आव्हान असेल. शिवाय या रशियन खेळाडूला प्रज्ञानंदचाही सामना करावा लागणार आहे. या दोन लढती स्पर्धेची दिशा स्पष्ट करण्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महिला गटात हिंदुस्थानी खेळाडूंचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. केवळ कोनेरू हम्पीला जर-तरच्या समीकरणावर अंधुकशी आशा असेल. ती सध्या 4.5 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.