उड्डाणाला उशीर झाल्याने संयम सुटला, इंडिगो विमानात सहवैमानिकाला मारहाण; प्रवाशाला अटक

indigo

विमान उड्डाणाला तब्बल 10 तास उशीर झाल्यामुळे संयम सुटलेल्या प्रवाशाने सहवैमानिकालाच मारहाण केल्याची घटना रविवारी घडली. हे विमान गोव्याला जात होते. उड्डाणाला उशीर झाल्याची माहिती देत असताना संतापलेल्या प्रवाशाने सहवैमानिकाला मारहाण केली. या प्रवाशाला अटक करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी सोमवारी दिली. मारहाणीचा व्हीडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

साहील कटारिया असे या प्रवाशाचे नाव आहे. फ्लाईटरडार24 या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार तब्बल 10 तासांच्या विलंबानंतर रविवारी सायंकाळी 6 वाजता गोव्यासाठी विमानाने उड्डाण घेतले. अनुप कुमार असे मारहाण झालेल्या सहवैमानिकाचे नाव आहे. संपूर्ण दिल्ली धुरक्यात बुडाल्यामुळे विमान उड्डाणांना उशीर होत असल्याचे चित्र आहे. अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली तर अनेक उड्डाणे दुसरीकडे वळवण्यात आली. मात्र प्रवाशाने वैमानिकाला अशा प्रकारे मारहाण करणे चुकीचे आहे. त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले. तसेच प्रवाशांना उत्तम सुविधा मिळतील, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश विमान कंपन्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रवाशाला नो फ्लाय लिस्टमध्ये टाकणार

विमानात घडलेल्या घटने प्रकरणी स्वतंत्र अंतर्गत समिती नेमण्यात येईल आणि संबंधित प्रवाशाला नो फ्लाय लिस्टमध्ये टाकण्याबद्दल निर्णय घेण्यात येईल, असे इंडिगोच्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.