वर्ल्ड कप राऊंडअप – 4 कोटी 30 लाख मोबाईलवर लाइव्ह

प्रातिनिधीक फोटो

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याने स्ट्रिमिंगच्या दुनियेत नवा विक्रम प्रस्थापित केला. अत्यंत चुरशीचा झालेला सामना 4 कोटी 30 लाखापेक्षा अधिक क्रिकेटप्रेमी डिज्नी हॉटस्टार या ऍपवरून लाइव्ह पाहत होते. हा आजवरचा विक्रम आहे. याआधी हिंदुस्थान आणि पाकिस्तान हा वर्ल्ड कपचा सामना 3.5 कोटी क्रिकेटप्रेमींनी लाइव्ह पाहिला होता. विशेष म्हणजे या सामन्यावर हिंदुस्थान-न्यूझीलंड हा सामना भारी पडला. अवघ्या आठ दिवसांतच त्यांच्या लाइव्ह स्ट्रिमिंगचा विक्रम मोडला गेला. आजवर कोणताही सामना किंवा सोहळा इतक्या मोठय़ा संख्येने स्ट्रिमिंगवर लाइव्ह पाहिला गेला नव्हता. हा एकप्रकारे नवा विश्वविक्रमच आहे.

पाकिस्तानी संघात वाद नाही

सातत्याने अपयशी कामगिरी करणारा पाकिस्तानी संघ अंतर्गत गटबाजीने पोखरला असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. मात्र या वृत्ताचे आज पीसीबीने खंडन केले. संघात कोणतीही गटबाजी नाही आणि कोणताही वाद नसल्याचे सांगत या निव्वळ अफवा असल्याचे पीसीबीने स्पष्ट केले. काही पाकिस्तानी पत्रकारांनीच संघात अंतर्गत वाद असल्याचे वृत्त दिले होते. अफगाणिस्तान सामन्यानंतर पत्रकारांना सविस्तर माहिती देणार असल्याचे पीसीबीने कळवले आहे. पाकिस्तानी पत्रकारांच्या वृत्तानुसार दोन खेळाडू एकमेकांना भिडले होते. ज्यामुळे हा वाद आणखी उफाळून आला होता. या प्रकरणानंतर पाकिस्तानी संघाचा एक गट कर्णधार बाबर आझमवर नाराज होता.

टॉपली वर्ल्ड कपमधून आऊट

 ऐनवेळी फिटनेसने दगा दिल्याने आधीच सहा क्रिकेटपटूंचे यंदाच्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचे स्वप्न अधुरे राहिले. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनही दुखापतीमुळे महिनाभर मैदानावर उतरू शकणार नाहीये. याचबरोबर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंडय़ाच्याही घोटय़ाला दुखापत झाल्याने  टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. आता वेगवान गोलंदाज रीस टॉपलीच्या तर्जनीला दुखापत झाल्याने तोही उर्वरित वर्ल्ड कपला मुकल्याने इंग्लंडचा पाय खोलात गेला आहे.