IPL 2024 : शशांकच पंजाबचा किंग! गुजरातच्या 200 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग

4 बाद 70 अशी बिकट अवस्था असतानाही शशांक सिंग पंजाबचा किंग ठरला. शुबमन गिलच्या झंझावाती खेळीमुळे गुजरात टायटन्सने उभारलेले 200 धावांचे जबरदस्त आव्हान शशांक सिंगच्या अद्भुत खेळीमुळे पंजाब किंग्जने एक चेंडू राखून पार पाडले.

गुजरात टायटन्सच्या 200 धावांचा पाठलाग करताना पंजाबला दुसऱयाच षटकांत शिखर धवनरूपी धक्का बसला. त्याने केवळ एकच धाव केली होती. पुढे जॉनी बेअरस्टॉ (22) आणि प्रभसिमरन सिंग (35) यांनी जोरदार खेळ केला. पण नूर अहमदने दोघांनाही बाद करत पंजाबला हादरविले. पुढे सॅम करणही (5) बाद झाला आणि गुजरातने सामन्यावर आपली पकड मजबूत केली. 10 षटकांत 83 धावा करणाऱया पंजाबला 117 धावांची गरज होती. मैदानात एकही अनुभवी खेळाडू नव्हता. पंजाबसाठी हे लक्ष्य कठीणच होते. तेव्हा शशांकने सिंकदर रझासह 41 धावांची भर घातली.  मग जितेश वर्मासह 39 धावांची भागी रचून त्यांनी संघाला दीडशतकी टप्पा गाठून दिला.

शशांकआशुतोषने सामना फिरवला

27 चेंडूंत  50 धावांची गरज असताना शशांक आणि आशुतोष शर्माने चौकार-षटकारांची बरसात करीत सामना गुजरातच्या हातातून काढून घेण्याची किमया दाखवली. दोघांनी 18 व्या आणि 19 व्या षटकांत 16 आणि 18 धावा चोपत पंजाबला थेट विजयाच्या उंबरठय़ावर नेले. शेवटच्या षटकांत केवळ 7 धावांची गरज असताना आशुतोषची 17 चेंडूंतील 31 धावांची खेळी थांबली. त्यानंतर गुजरात सामन्यातून बाहेर फेकला गेला होता. तरीही सामना पाचव्या चेंडूपर्यंत गेला आणि शशांकनेच लेगबायच्या रूपात विजयी धाव काढत पंजाबला दुसरा विजय मिळवून दिला.

संकटमोचक ठरलेल्या शशांकने 29 चेंडूंत 6 चौकार आणि 4 षटकारांसह 61 धावांची अभेद्य खेळी केली. हे त्याचे पहिलेच अर्धशतक होते. शुबमनपेक्षा त्याची खेळी वरचढ ठरली आणि तोच ‘सामनावीर’ ठरला.

त्याआधी शिखर धवनने नाणेफेक जिंकली आणि गुजरातला फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय योग्यच ठरला. वृद्धिमान साहा केवळ 11 धावांवर बाद झाला, मात्र गिलने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत शेवटपर्यंत फटकेबाजी करत मोठी धावसंख्या उभारून दिली. फक्त तो स्वताचे शतक आणि संघाचे द्विशतक साजरे करू शकला नाही.

अखेर गिलची मैदानात षटकारबाजी

आयपीएलच्या तिन्ही सामन्यांत गिलच्या बॅटीतून 31, 8, 36 अशा खेळय़ा निघाल्या होत्या. या तिन्ही खेळय़ा त्याच्या लौकिकास साजेशा नव्हत्या. संघाची कामगिरी चांगली असली तरी गिलवर कर्णधारपदाचे ओझे वाटत होते. अखेर आपण कोणत्याही दडपणाखाली नसल्याचे दाखवताना  गिलने पंजाबच्या गोलंदाजीला अक्षरशः फोडून काढताना त्याने 6 चौकार आणि 4 षटकारांची फटकेबाजी केली. त्याने केन विल्यम्सनसह 40 आणि साई सुदर्शनबरोबर 53 धावांची भागी रचत संघाच्या डावाला बळकटी दिली नाही तर संघाला शतकापलीकडे नेले.

14 षटकांत 122 धावा करणाऱया गुजरातला शेवटच्या सहा षटकांत 77 धावांची वसुली गिल आणि राहुल तेवथियाने करून दिली. राहुलने आठ चेंडूंत तीन चौकार आणि एक षटकार ठोकत केलेल्या 23 धावांमुळे गुजरात 199 पर्यंत पोहोचला. सलामीला उतरलेला गिल 89 धावांवर नाबाद राहिला.