IPL 2024 – पुन्हा हारसीबी, आयपीएल जेतेपद बंगळुरूपासून दूरच

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत तब्बल तीन वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे विजेतेपदाचे स्वप्न 17 व्या हंगामातही भंगले. आयपीएलच्या पहिल्या जेतेपदावर (2008 साली) नाव कोरणाऱया राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटर लढतीत बंगळुरूवर 4 फलंदाज व 6 चेंडू राखून विजय मिळविला. आता क्वॉलिफायर-2 लढतीत राजस्थान व सनरायझर्स हैदराबाद यांच्यात अंतिम फेरी गाठण्यासाठी रस्सीखेच रंगणार आहे. ट्रेंट बोल्ट व रविचंद्रन अश्विन, आवेश खान यांची भन्नाट गोलंदाजी करीत राजस्थानच्या विजयाची खऱया अर्थाने पायाभरणी केली होती.

बंगळुरूकडून मिळालेले 173 धावांचे लक्ष्य राजस्थानने 19 षटकांत 6 बाद 174 धावा करून पूर्ण केले. यशस्वी जैस्वाल (45) व टॉम कोल्हर-पॅडमोर (20) यांनी राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली. लॉकी फर्ग्युसनने पॅडमोरचा त्रिफळा उडविला, तर कॅमेरून ग्रीनने जैस्वालला यष्टीमागे कार्तिककरवी झेलबाद केले, मात्र त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन (17) व ध्रुव जुरेल (7) लवकर बाद झाले. त्यानंतर रियान पराग (36) व शिमरॉन हेटमायर (26) यांनी राजस्थानच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. शेवटी रोवमन पॉवेलने 8 चेंडूंत नाबाद 16 धावांची खेळी करीत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पॉवेलने षटकार ठोकूनच सामना संपविला. बंगळुरूकडून मोहम्मद सिराजने 2, तर लॉकी फर्ग्युसन, कर्ण शर्मा व पॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.

अश्विनचा डबल धमाका

सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर कॅमेरून ग्रीन (27) व रजत पाटीदार (34) यांनी तिसऱया विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली, मात्र रविचंद्रन अश्विनने 13 व्या षटकांत ग्रीन व त्याच्या जागेवर आलेला ग्लेन मॅक्सवेल (0) यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद करून बंगळुरूच्या फलंदाजीवर दडपण आणले.

आवेशचा जोश

बंगळुरूने शंभरीच्या आत 4 फलंदाज गमविल्यानंतर रजत पाटीदार (34), महिपाल लोमरोर (32) यांनी राजस्थानच्या गोलंदाजीचा काही वेळ प्रतिकार केला. महिपालने 17 चेंडूंत 2 षटकार व तितक्याच चौकारांसह वेगवान धावा जमविल्या. त्याने आधी पाटीदारसोबत 10 चेंडूंत 25 धावांची, तर दिनेश कार्तिकसोबत 24 चेंडूंत 32 धावांची भागीदारी केली, म्हणून बंगळुरूला 172 धावांपर्यंत मजल मारता आली. या तीनही महत्त्वाच्या फलंदाजांना आवेश खानने बाद करून बंगळुरूच्या धावगतीला लगाम घालण्याचे काम चोखपणे बजावले. राजस्थानकडून आवेश खानने 3, तर रविचंद्रन अश्विनने 2 फलंदाज बाद केले. ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा व युझवेंद्र चहल यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.

कोहलीची ऐतिहासिक कामगिरी

टीम इंडियाचा ‘रन मशीन’ असलेल्या विराट कोहलीने आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतही बुधवारी इतिहास रचला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा स्टार फलंदाज राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या एलिमिनेटर लढतीत आयपीएलच्या इतिहासात आठ हजार धावांचा टप्पा गाठणारा पहिला क्रिकेटपटू ठरला, हे विशेष. आज 33 धावांची खेळी करणाऱया कोहलीने 29 धावा करताच आयपीएलमधील आठ हजार धावा पूर्ण करून आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा खोचला. कोहलीने आयपीएलमधील 252व्या सामन्याच्या 244 व्या डावात आठ हजार धावा पूर्ण केल्या. लीगमध्ये चार हजार, सहा हजार आणि सात हजार धावा करणारा तो सर्वात वेगवान फलंदाज आहे. आयपीएलमध्ये सर्वात जलद 1000 धावा अॅडम गिलख्रिस्टने केल्या होत्या. याचबरोबर सर्वात जलद 2000 धावा, 3000 धावा आणि 5000 धावा सुरेश रैनाने केल्या होत्या.

कोहली-डय़ु प्लेसिस अपयशी

त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 172 धावसंख्या उभारली. विराट कोहली (33) व कर्णधार फाफ डय़ु प्लेसिस (17) यांनी 4.4 षटकांत 37 धावांची सलामीची दिली खरी, पण एलिमिनेटरसारख्या महत्त्वाच्या लढतीत आज ही स्टार जोडी अपयशी ठरली. कोहलीने 24 चेंडूंत 3 चौकारांसह एक षटकार ठोकला, तर डय़ु प्लेसिसने 14 चेंडूंत 2 चौकारांसह एक षटकार लगावला. ट्रेंट बोल्टने डय़ु प्लेसिसला पॉवेलकरवी झेलबाद करून बंगळुरूला पहिला धक्का दिला. मग युझवेंद्र चहलने कोहलीला बदली खेळाडू डोनोव्हर फरेराकरवी झेलबाद करून राजस्थानला बहुमोल बळी मिळवून दिला.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

विराट कोहली – 8004 धावा
शिखर धवन -6769 धावा
रोहित शर्मा – 6628 धावा
डेव्हिड वॉर्नर – 6565 धावा
सुरेश रैना- 5528 धावा