लखनऊच ठाकूर! गुजरातवर 33 धावांनी मात

गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीत लखनऊ सुपर जायंट्सच ठाकूर ठरला. मार्कस स्टॉयनिसच्या तडाखेबंद 58 धावांच्या खेळीमुळे लखनऊ सुपर जायंट्सने दिलेले 164 धावांचे आव्हान गुजरातला पेलवलेच नाही आणि यश ठाकूरच्या भेदकतेपुढे गुजरातचा संघ 130 धावांतच आटोपला. ठाकूरने 30 धावांत अर्धा संघ गारद करताना यंदाच्या आयपीएलमधील सर्वोच्च गोलंदाजी करण्याची किमया साधली.

लखनऊचे 164 धावांचे आव्हान खूप कमी असल्याचे प्रथमदर्शनी जाणवले. पण शुबमन गिल आणि साई सुदर्शनने 51 धावांची सलामी देताना गुजरातला विजयी ट्रकवर ठेवले होते. पण यश ठाकूरने शुबमनला बोल्ड करून लखनऊला पहिले यश मिळवून दिले आणि त्यानंतर सामन्याने कूस बदलायलाही सुरुवात केली. पुढे गुजरातच्या डावाला कुणीच धावा करून देऊ शकला नाही. यश ठाकूर आणि कृणाल पंडय़ाने टप्प्याटप्प्याने गुजरातचे फलंदाज बाद करत आपला विजय निश्तित केला होता. राहुल तेवथियाने (30) संघाच्या विजयासाठी थोडेफार प्रयत्न केले, पण अन्य कुणाचीही साथ न लाभल्यामुळे त्यांचा संघ 19 व्या षटकांतच बाद झाला. ठाकूरने 30 धावांत 5 विकेट टिपले तर कृणाल पंडय़ाने 11 धावांत 3 फलंदाज बाद केले. यंदाच्या आयपीएलमध्ये 21 व्या सामन्यात दुसऱयांदाच एखादा संघ ऑलआऊट झाला तर प्रथमच पाच विकेट एका गोलंदाजाकडून टिपले गेले.

तत्पूर्वी लोकेश राहुलने टॉस जिंकून फटकेबाजीसाठी फलंदाजीला उतरण्याचा निर्णय घेतला, पण क्विंटन डिकॉक (6) आणि देवदत्त पडिक्कल (7) या आघाडीवीरांना उमेश यादवने बाद करत गुजरातला दणदणीत सुरुवात करून दिली. 2 बाद 18 अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी सलामीला आलेल्या राहुलकडून चौकार-षटकारांची अपेक्षा होती, मात्र त्याने निराशा केली. त्याने मार्कस स्टॉयनिसह 73 धावांची भागी रचली. स्वतः तासभर खेळपट्टीवर उभा राहिला, पण त्याला 31 चेंडूंत केवळ 33 धावाच करता आल्या. एवढेच नव्हे तर त्याच्या बॅटीतून 3 चौकारच निघाले. दुसरीकडे स्टॉयनिसने 4 चौकार आणि 2 षटकार खेचताना 58 धावा फटकावल्यामुळे लखनऊला 15 षटकांत 112 धावा करता आल्या. मग शेवटच्या 5 षटकांत निकोलस पूरन आणि आयुष बदोनीने आक्रमक खेळ केल्यामुळे लखनऊला 51 धावा काढता आल्या आणि त्यांनी धावसंख्येला 163 पर्यंत नेले. 32 धावा करणाऱया पूरनने 3 खणखणीत षटकार ठोकले.