ऍड. बापूसाहेब परुळेकर यांचे निधन

जनता पार्टीचे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार अॅड. बापूसाहेब परुळेकर यांचे आज सकाळी 8 वा. 50 मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

चंद्रकांत काशीनाथ परुळेकर हे बापूसाहेब परुळेकर नावाने परिचित होते. जनता पार्टीकडून ते 1971 मध्ये सर्वप्रथम लोकसभा निवडणूक लढले तेव्हा शामराव पेजे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर 1977 साली ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. 1980 सालातील लोकसभा निवडणुकीत जनता पार्टीचा महाराष्ट्रात धुव्वा उडाला होता तेव्हा दोनच खासदार निवडून आले होते त्यामध्ये बापूसाहेब परुळेकर यांचा समावेश होता. ते सहाव्या आणि सातव्या लोकसभेचे सदस्य होते. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांचेच ते मार्गदर्शक होते.

बापूसाहेब परुळेकर यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभाग घेतला होता. त्यांच्या नेतृत्वात रत्नागिरीत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली होती. रत्नागिरी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली होती त्या समितीचे प्रमुख बापूसाहेब परुळेकर होते.