22000 हजार मेट्रीक टनाचा माल वाहून आणणाऱ्या बोटीचे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये स्वागत

तब्बल 22 हजार मेट्रीक टन माल घेऊन आलेल्या बोटीचे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने स्वागत केले आहे. इतक्या मोठ्या क्षमतेचा माल वाहून आणणारी बोट ही पहिल्यांदाच या बंदरात पोहोचली आहे. या बोटीतून महाराष्ट्र आणि गुजरातमधील उद्योगांसाठी लागणाऱ्या कोल्ड रोल्ड स्टील कॉईल आणण्यात आल्या आहेत. ओरिसातील पारादीप इथून निघालेली ही मालवाहू बोट 17 ऑगस्टला बंदरात पोहोचली आहे. जेएनपीटीमध्ये गुंतवणूक वाढावी, पायाभूत सुविधांचा विकास व्हावा आणि योग्य संचालन व्हावे यासाठी जेएनपीटी आणि न्हावा शेवा डिस्ट्रीब्युशन टर्मिनल यांच्यात भागीदारी झाली आहे. या भागीदारीतून झालेल्या प्रयत्नांमुळे इतक्या मोठ्या क्षमतेची मालवाहू बोट टर्मिनलला आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

सागरी वाहतूक हा एक स्वस्त पर्याय असून त्यामुळे रस्ते वाहतुकीवर येणारा भार कमी होण्यास मदत होते. एक बोट ही किमान 2 हजार ट्रकमधून जेवढी वाहतूक होते तेवढा माल एकाचवेळी वाहून आणते. पूर्वेकडील किनाऱ्यापासून पश्चिमेकडे असलेल्या महाराष्ट्रातील विविध शहरांपर्यंत माल वेगाने वाहून आणण्यासाठी जलमार्गाचा बराच फायदा होऊ शकतो. जलमार्गाने होणाऱ्या वाहतुकीमुळे रस्त्यावर अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे होणारी कोंडी आणि प्रदूषण कमी होण्यासही मदत होईल.