मराठा समाजाविषयी अपशब्द काढणारे पोलीस निरीक्षक शरण आले, किरण बकालेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी

जवळपास दीड वर्ष फरार असलेले जळगावचे पोलीस निरीक्षक किरण बकाले अखेर पोलिसांना शरण आले आहेत. बकाले यांना सोमवारी न्यायालयात हजर केलं असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. बकालेंना न्यायालयात आणण्यात येणार असल्याचे कळताच मराठा समाजातील नागरिकांनी न्यायालय परिसरात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. तिथली गर्दी पाहिल्यानंतर बकाले यांना न्यायाधीश केळकर यांच्या निवासस्थानी हजर करण्याचा निर्णय घेण्यात आला. बकाले यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी फोनवरून बोलताना अपशब्द काढले होते. त्यांचे रेकॉर्डींग व्हायरल झाल्यानंतर विनोद देशमुख यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरण विधानसभेमध्येही उचलण्यात आले होते. बकाले यांना निलंबित करून नाशिक येथे हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, हे आदेश न मानता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठानेही त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर बकाले यांनी अटक टाळण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले होते. सुमारे दीड वर्षांपासून अधिक काळापासून ते बेपत्ता होते.

दीड वर्ष बकाले सापडत नसल्याने पोलिसांवर टीका करण्यात येत होती. सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाने जामिनासाठीचे अर्ज फेटाळल्यानंतर बकाले फरार झाले होते. त्यांच्याविरोधात पोलिसांनी वॉरंट जारी केले होते आणि त्यांची मालमत्ता जप्त करण्यासाठी न्यायालयात विनंती केली होती. हे सगळे प्रकरण आपल्या आणखी अंगाशी येणार हे कळाल्याने बकाले यांनी पोलिसांना शरण येण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी सकाळी बकाले यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून आपण शरण येत असल्याचे सांगितले.