पूर्व उपनगरातील डोंगराळ भागाला मिळणार मुबलक पाणी

पालिका 16 हजार 853 मीटर जलवाहिन्या टाकणार

पालिकेच्या पूर्व उपनगरातील डोंगराळ, टेकडी भागातील रहिवाशांना आता मुबलक पाणी मिळणार आहे. या भागातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी पालिका 16 हजार 853 मीटर जलवाहिन्या कुर्ला, भांडुप, घाटकोपर, विक्रोळी आदींसह 58 डोंगराळ भागांत टाकण्यात येणार आहेत.

मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा प्रकल्पातून दररोज 3850 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र पूर्व उपनगरातील काही डोंगराळ-टेकडीवरील भागांना उंचीमुळे पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. यातच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया अनेक ब्रिटिशकालीन जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. यामुळेही पाणी गळती होऊन अनेक भागांत पाणीपुरवठय़ावर परिणाम होतो. ही समस्या दूर करण्यासाठी पूर्व उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी, भांडुप येथील जुन्या जलवाहिन्या बदलत विविध व्यासाच्या नवीन जलवाहिन्या टाकण्याची कार्यवाही याआधीच सुरू करण्यात आली आहे. तर आता 58 डोंगरी भागात नव्याने जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. यामध्ये पूर्व उपनगरात 50 मि.मी. ते 300 मि.मी. व्यासाच्या जलवाहिनी टाकण्यात येणार आहेत.

या भागांना दिलासा

नव्याने जलवाहिन्या टाकण्यात येणार असल्यामुळे किस्मत नगर, काजूपाडा, टॅक्सीमेन कॉलनी, मॅच फॅक्टरी लेन, खैरानी रोड, तकिया वॉर्ड, विक्रोळी सर्वेश्वर मंदिर मार्ग, पार्कसाईट, घाटकोपर आझाद नगर, भटवाडी, बर्वेनगर भागातील रहिवाशांना मुबलक पाणी मिळणार आहे.