आडवाणी यांना भारतरत्न प्रदान

देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना त्यांच्या निवासस्थानी प्रदान केला. या वेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि आडवाणी यांचे कुटुंबीय उपस्थित होते. भारतीय राजकारणातील भीष्माचार्य अशा शब्दांत 96 वर्षीय आडवाणी यांचा गौरव राष्ट्रपती भवनातून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. राजकीयदृष्ट्या प्रभावी आणि बौद्धिकदृष्ट्या प्रेरणादायी असे योगदान आडवाणी यांनी दिले असल्याचे राष्ट्रपती भवनाने एक्सवर म्हटले आहे.

मोदींनी केला राष्ट्रपतींचा अनादर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या अडवाणींना भारतरत्न प्रदान करत असताना पंतप्रधान मोदी अडवाणींच्या शेजारील खुर्चीत बसून राहिले. इतर सर्वजण राष्ट्रपतींप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी उभे असताना मोदी यांनी राष्ट्रपती उभ्या असताना खुर्चीत बसून त्यांचा घोर अनादर केला आहे, अशी टीका हा फोटो ट्विट करत काँग्रेसने केली आहे. राष्ट्रपती उभ्या राहून भारतरत्न प्रदान करत असताना शिष्टाचारानुसार मोदी यांनीही इतरांप्रमाणे मुर्मू यांच्याप्रती आदर दाखवण्यासाठी उभे राहायला हवे होते, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.