नवरात्र उत्सव समजून घेताना…

>> लता गुठे, [email protected]

लोकशिक्षक संत एकनाथ महाराजांची अनेक भारुडं ही स्री जाणिवांची आहेत. समाजामध्ये स्त्रियांना एकीकडे देवी म्हणून पुजलं जातं आणि दुसरीकडे दासी समजून तिची विटंबना केली जाते हे संत एकनाथ महाराजांनी जाणलं होतं. तिच्या वेदनेला बोलतं केलं ते एकनाथांनी.  रूपकांचा वापर करून विनोदी अंगाने भारुडं रचली. सातशे वर्षांपूर्वी आदिशक्ती आदिमायेपासून अगदी कोल्हाटीण, परटीण अशा तळागाळातील स्त्रियांवरही त्यांनी भारुडे रचली. इतकंच काय, आदिशक्ती आदिमायेला शरण जाऊन त्यांनी समाजातील अज्ञानाचा अंधकार दूर होण्यासाठी  त्या आदिशक्तीचे  दार ठोठावले.

वरात्र उत्सवाचा विचार करताना मला  संत एकनाथांच्या भारुडातील  विचार समजून घेणे हे जास्त महत्त्वाचे वाटते. लोकशिक्षक संत एकनाथ महाराजांची अनेक भारुडं ही स्री जाणिवांची आहेत. समाजामध्ये स्त्रियांना एकीकडे देवी म्हणून पुजलं जातं आणि दुसरीकडे दासी समजून तिची विटंबना केली जाते हे संत एकनाथ महाराजांनी जाणलं होतं. त्या काळातील स्त्रियांना होणारा सासुरवास, त्यांचे दुःख, वेदना, स्त्रियांची होणारी अवहेलना हे सर्व ती वर्षानुवर्षांपासून मूकपणे सहन करत होती. तिच्या वेदनेला बोलतं केलं ते एकनाथांनी. सातशे वर्षांपूर्वी आदिशक्ती आदिमायेपासून अगदी कोल्हाटीण, परटीण अशा तळागाळातील स्त्रियांवरही त्यांनी भारुडे रचली. आदिशक्ती आदिमायेला शरण जाऊन त्यांनी समाजातील अज्ञानाचा अंधकार दूर होण्यासाठी  त्या आदिशक्तीचे  दार ठोठावले. ‘दार उघड बये दार उघडत’ म्हणत मातृदेवता आदिशक्तीला ते शरण गेले. ही आदिशक्ती म्हणजे पराशक्ती, विश्वनिर्मितीच्या चराचरात चैतन्य रूपात सामावलेली. प्रत्येक स्त्राrमध्ये  सामावलेली, नवनिर्मितीच्या मुळाशी असलेली शक्ती, जिचा नवरात्रीमध्ये जागर केला जातो. आदिमायेला प्रार्थना करून, उपास करून शरीरशुद्धी केली जाते.

ग्रामीण भागामध्ये नवरात्रीत गोंधळी येतात. त्यांच्याकडे संबळ असतं. त्या संबळावर ते देवीला शरण जाण्यासाठी गोंधळ मांडतात आणि म्हणतात…

‘सुवेळ सुदिन तुझा गोंधळ मांडिला वो।

ज्ञान वैराग्याच्या वरती फुलवरा बांधिला वो।

चंद्रसूर्य दोन्ही यांचा पोत पाजळीला वो।

घालुनि सिंहासन वरती घट स्थापियला वो।

उदो बोला उदो सद्गुरू माऊलीचा वो।।’

या भारुडाचा अर्थ असा… हे माते, तुझ्या कृपेचे दार बंद झाल्यामुळे समाज जीवन विकारग्रस्त झाले आहे. रामराज्य लयाला जाऊन राक्षसांचे राज्य उदयाला येत आहे. या विकारग्रस्त समाजावर दुबळा शत्रूसुद्धा खूप वर्षे राज्य करीत आहे. तेव्हा तुझ्या कृपेचे दार आता उघडलेच पाहिजे. म्हणून नाथ पुनपुन्हा म्हणतात…

‘दार उघड बया आता दार उघड

अलक्ष पूर भवानी दार उघड

कोल्हापूर लक्ष्मी दार उघड

तेलंग लक्ष्मी दार उघड

तुळजापूर भवानी दार उघड’

आपले सण, उत्सव शेतीशी तसेच ऋतूंशी जोडले गेलेले आहेत. मग ती पांत असो होळी असो किंवा नवरात्र. या सर्वांना हजारो वर्षांची परंपरा आहे. रामायण, महाभारतापासून ही परंपरा चालत आली आहे. उदा. नवरात्रीमध्ये घट बसवला जातो. सर्वांचा पोशिंदा शेतकरी या मातीला आपली आई मानतो. त्या धरणी मातेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातीपासून घट बनवितात. त्या घटांमध्ये नवीन येणारी धान्यं मातीमध्ये रुजवतात. प्रत्येक दिवशी नदीवर आंघोळ करून नदीचे पाणी आणून घटाला जल अर्पण करतात आणि रानफुलांचे हार करून प्रत्येक दिवसाची एक माळ बनवतात. दररोज एक माळ अशा नवरात्रीच्या नऊ माळा आदिशक्तीला म्हणजेच धरती मातेला मोठय़ा भक्तिभावाने अर्पण करतात.

नवरात्र उत्सव, शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव समजला जातो  कारण तो शरद ऋतूच्या प्रारंभी येतो. हिंदू धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोनवेळा केली जाते. नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. दहाव्या दिवशी दसरा सणाला विसर्जन केले जाते. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, दीप प्रज्वलित करून आदिशक्तीची नऊ दिवस मनोभावे पूजाअर्चा आणि सकाळ-संध्याकाळ आरती करून, देवीची ध्यानधारणा करून नंतर नैवेद्य दाखवितात. नऊ दिवस अखंड दीप प्रज्वलित ठेवला जातो. दिवा हे मांगल्याचे शुभ प्रतीक समजतात. दिव्याच्या प्रकाशामुळे अंधार तर नाहीसा होतो. वातावरण प्रसन्न होते. सोबत मनातील अंधकारही नाहीसा होतो. म्हणून देवीपुढे नऊ दिवस अखंड दिवा तेवत ठेवण्याची प्रथा आहे.

ग्रामीण भागामध्ये कुलदेवतेच्या पूजेला जास्त महत्त्व आहे. यासाठी प्रत्येक घरामध्ये घटस्थापना केली जाते. मातीचा नवाकोरा घट कुंभाराकडून विकत आणला जातो, नंतर शेतातली माती आणून एका नव्या टोपलीत किंवा ताटामध्ये पसरवतात. त्यामध्ये नऊ प्रकारचे धान्य पेरतात आणि त्यावर मातीचा थर देऊन पाणी शिंपडले जाते. मातीवर तो नवीन घट ठेवून त्यामध्ये पाणी टाकून एक पैशाचं नाणं टाकतात आणि त्या घाटावर एक छोटी मातीची वाटी ठेवून पंचोपचारे घटाची पूजा केली जाते. शेवटी देवीची आरती करून देवीची आळवणी केली जाते.

‘दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।

अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ।

वारी वारीं जन्ममरणाते वारी ।

हारी पडलो आता संकट निवारी ।। 1 ।।

नवरात्र उत्सवामध्ये स्त्रियाच घट बसवतात याचं कारण म्हणजे स्त्रियांनी शेतीचा शोध लावला, जमिनीत बिया टाकून धान्य उगविले. स्त्राr ही नवनिर्मितीचा स्रोत समजली जाते. शेतीच्या शोध लावणाऱ्या स्त्रिया अन् अपत्य जन्माला घालून मानवाचा वंश टिकविणाऱ्याही त्याच. स्त्राrसत्ताक गणसमाजात ही धारणा होती. सृजनाचं, नवनिर्मितीचं काम फक्त स्त्रियाच करू शकतात. याच धारणेतून पुरुषही आदिशक्तीपुढे नतमस्तक होतात. घट हा स्त्राrच्या पवित्र गर्भाशयाचे प्रतीकही समजला जातो. देवीच्या कृपेने नवनिर्मितीच्या सृजन प्रािढयेला आशीर्वाद मिळावा यासाठी नवरात्री साजरी केली जाते. काही भागांमध्ये अष्टमीला कुमारिका पूजन करतात. कारण कन्येला आपल्याकडे लक्ष्मीचं रूप मानतात. म्हणजेच कुमारिकेला देवीचे प्रतीक मानून तिची पूजा करून तिला जेवायला वाढतात.

नऊ दिवस देवीची आराधना, उपासना, गुणगान केलं जातं. नवरात्रीचा इतिहास सांगताना नऊ आदिशक्तीची रूपे  मूळ स्थानी पूज्य मानली जातात, ज्यांची नवरात्रात वेगवेगळ्या भागांमध्ये पूजा केली जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चन्द्रघंटा, कुष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी  सिद्धिदात्री अशी त्यांची नावे सांगितली जातात. आपल्याकडे महाराष्ट्रात जी देवीची साडेतीन शक्तिपीठे समजली जातात, त्या ठिकाणी गोंधळी कवडय़ाच्या माळा घालून संबळ वाजवत देवीची स्तुती असणारी कवनं म्हणतात, देवीचा गुणगौरव गात  तिच्या शौर्याची गाथा गातात.

नवव्या दिवशी प्रत्येक देवीच्या मंदिरामध्ये होमहवन केले जाते. होमात कोहळा, नारळ अर्पण करतात. होमात नैवेद्य अर्पण केल्यानंतरच उपवास सोडतात. दसऱ्याच्या दिवशी पुरुष मंडळी सीमोल्लंघनाला जातात तेव्हा घट हलवून अंकुरलेले धान्य गावातील मंदिरामध्ये, देवांसमोर वाहिले जाते . ते उगवलेलं धान्य हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. विजयादशमीला म्हणजेच दसऱ्याला आपटय़ाच्या पानांची पूजा करून, शस्त्रास्त्रांची पूजा करून आपटय़ाची पाने सोनं म्हणून सर्व मित्रमंडळी, नातेवाईक यांना भेट म्हणून वाटतात. अशा रीतीने उत्सवाची सांगता होते. जाता जाता मला एवढंच म्हणावंसं वाटतं की, नवरात्र उत्सवामागे जी सांस्कृतिक पारंपरिक भावना आहे, ती जपूया आणि आदिशक्तीचा उत्सव साजरा करूया!

 (लेखिका कवयित्री, संपादिका, प्रकाशिका आहेत)