भाजपने अमित शहांच्या सभेसाठी मैदान ढापले; बच्चू कडू यांचा सभास्थळी ठिय्या

निवडणुकीत मित्रपक्षांना आयत्या वेळी साईडलाईन करून पाहिजे असलेला पक्ष आणि उमेदवारासाठी आपुलकीचे नाटक करणाऱया भाजपला आज प्रहार संघटनेच्या आमदार बच्चू कडू यांनी चांगलाच दणका दिला. कडू यांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचारसभेसाठी बुक केलेले मैदान भाजपने अमित शहा यांच्या सभेसाठी ढापल्याने संतापलेल्या बच्चू कडू यांनी राडा करत सभास्थानी ठिय्या आंदोलन केले. त्यांची समजूत काढता काढता पोलीस अधिकाऱयांच्या नाकीनऊ आले.

अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्यात लोकसभा निवडणूक घोषित झाल्यापासून खडाजंगी सुरू आहे. त्यातच 23 आणि 24 एप्रिलसाठी अमरावतीच्या सायन्स कोर मैदानात बच्चू कडूंना उमेदवार दिनेश बुब यांच्या सभेसाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी देण्यात आली होती, मात्र त्याच मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नवनीत राणा यांच्यासाठी सभा घेणार आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांना दिलेली परवानगी सुरक्षेचे कारण देऊन रद्द करण्यात आली. कडू आज त्यांच्या सभेच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांसह येथे आले असताना त्यांना पोलिसांनी मैदानाबाहेरच रोखले.

शहा यांच्या सभेच्या परवानगीचे पत्र दाखवा!

आमच्याकडे निवडणूक आयोगाची परवानगी असतानाही आम्हाला मैदानाच्या आत का जाऊ देत नाही, पोलीस भाजपचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे आमची समजूत का घालत आहेत? अमित शहा यांच्या सभेसाठी जर परवानगी मिळाली असेल तर आम्हाला दाखवा, असे कडू यांनी पोलिसांना सुनावले.

सभेच्या परवानगीचे पत्र फाडले

बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाने सभा घेण्यासाठी दिलेले परवानगीचे पत्र पोलिसांसमोरच फाडून टाकले. पोलिसांनी आपल्या गळय़ात भाजपचा पट्टा घालावा आणि गाडीवर भाजपचे झेंडे लावा, असा संताप कडू यांनी व्यक्त केला.

हनुमानजींनी काम दाखवलं, एका झटक्यात मंडप पाडला बच्चू कडू यांची पोलिसांशी वादावादी सुरू असतानाच वादळी वाऱयामुळे अमित शहांच्या सभेसाठी अभारण्यात आलेला मंडप कोसळला. त्यावर कडू यांनी हनुमानजींनी काम दाखवलं, एक लाथ मारली आणि मंडप पाडला. त्यांची चालिसा पण चुकीची होती, राजकीय होती, हे नाही चालणार. देव आमच्यासोबत आहे, असा टोला राणा दांपत्याला लगावला.