संकटमोचकांनी शेपटीला चिंधी बांधून महायुतीत व्यत्यय आणू नये, नाशिकवरून महायुतीत ठिणगी; मिंधे गटाची गिरीश महाजनांना दमबाजी

नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये ठिणगी पडली आहे. मिंधे गट आणि अजित पवार गटामध्ये या जागेवरून जुंपली होती. आज त्यात भारतीय जनता पक्षानेही उडी घेतली. नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला असून तिथे भाजपचे तीन आमदार आणि 70 नगरसेवक असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला. त्यावरून मिंधे गट संतप्त झाला आहे. भाजपच्या संकटमोचकांनी शेपटीला चिंधी बांधून महायुतीत व्यत्यय आणू नये, असा दमच मिंधे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी महाजनांना दिला.

नाशिकच्या जागेवरून गेल्या काही दिवसांपासून महायुतीत घमासान सुरू आहे. मिंधे गटाचे नाशिकचे विद्यमान आमदार हेमंत गोडसे यांची आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळावी म्हणून नाशिक-मुंबई-नाशिक पळापळ सुरूच आहे. दुसरीकडे अजित पवार गटाने या जागेसाठी छगन भुजबळांच्या नावाची बोंब उठवली आहे. नाशिकमधील भाजपच्या आमदारांनीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही जागा आपल्याकडे घ्यावी अशी गळ घातली होती. त्यामुळे शिवसेनेशी गद्दारी करताना आपल्याला साथ देणारे गोडसे यांना न्याय कसा द्यायचा अशा विचाराने एकनाथ शिंदे यांचीही झोप उडाली आहे.