देश जागा झालाय… दिल्लीच्या खुर्चीखाली मतांचा बॉम्ब फुटणारच, उद्धव ठाकरे यांचा मोदी-शहांवर वज्राघात

>> अजित शिर्के/बाळासाहेब दारकुंडे

मोदी, शहांना पराभवाचे भूत दिसू लागले म्हणून त्यांनी आधी ‘राम राम राम राम’ केले. त्यानंतर हिंदू विरुद्ध मुसलमान हेही करून झाले. पण त्यातून काही निष्पन्न होत नाही हे पाहून आता निवडणुकीनंतर कुठे फटाके फुटणार.. हिंदुस्थानात की पाकिस्तानात? असे मथळे असलेल्या जाहिराती छापून पुन्हा पाकिस्तानची भीती दाखवू लागले आहेत. पण मोदीजी.. तुमच्या धोतरात चीन घुसलाय आणि तुम्ही आम्हाला पाकिस्तानची भीती कसली दाखवताय, असा सवाल करतानाच तुमचे जुमले आता चालणार नाहीत. देशाला जाग आली आहे. तुमच्या दिल्लीच्या खुर्चीखाली मतांचा बॉम्ब फुटणारच, असा जबरदस्त घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. ‘हातात आहे मशाल आणि विजय होणार विशाल’ असा नारा उद्धव ठाकरे यांनी दिला तेव्हा अलिबागचे जेएसएम मैदान आणि ऐरोलीचे श्रीराम विद्यालय मैदान शिवसेना झिंदाबाद.. इंडिया आघाडीचा विजय असो अशा गगनभेदी घोषणांनी दणाणून गेले.

रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 7 मे रोजी होणार आहे. आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिवसेना इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची भव्य सभा अलिबागच्या जेएसएम मैदानावर झाली. त्यानंतर ठाणे लोकसभेचे शिवसेना उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी त्यांची सभा ऐरोलीतील श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणात झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मतांसाठी फुटपाडे राजकारण करणारा भाजप, मोदी-शहा, मिंधे आणि अजित पवार गटावर जबरदस्त वज्राघात केला. आयपीएलमध्ये जसे बोली लावून खेळाडू पळवतात तसे महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपने बोली लावून गद्दार पळवले आहेत. महाराष्ट्र आणि रायगड ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे, शूरांची भूमी आहे. म्हणून आम्ही शूरा मी वंदिले असे म्हणतो. पण भाजपवाले चोरा मी वंदिले म्हणतात, असे तडाखे उद्धव ठाकरे यांनी लगावले. दहा वर्षांत लोकांची कामे केली असती तर ही फोडाफोडीची वेळच आली नसती, असे खडेबोलही त्यांनी सुनावले.

महाराष्ट्रावर दोन वक्रीवादळे घोंघावताहेत

मी मुख्यमंत्री असताना कोकणाने तौक्ते आणि निसर्ग अशा दोन चक्रीवादळांचा सामना केला. ती दोन चक्री वादळे होती. पण महाराष्ट्रावर मोदी, शहा ही वक्रीवादळे घोंघावताहेत. महाराष्ट्रासह कोकणवासी या वक्रीवादळांचा पक्का बंदोबस्त करतील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

तुम्ही संकट बनून माझ्यावर आला आहात

मध्येच मोदींना माझ्याबद्दल काय प्रेम आलं देव जाणे. म्हणे उद्धव ठाकरेंवर संकट आलं तर आम्ही मदतीला जाऊ. अरे, तुम्ही संकट आणून बघाच हे सुरक्षा कवच (समोर गर्दीकडे बोट दाखवून) माझ्यासोबत आहे. मोदीजी मला तुमच्या सुरक्षेची गरज नाही. माझे आईवडील आणि आई जगदंबेच्या सुरक्षेचे कवच माझ्याभोवती आहे आणि तुम्हीच संकट बनून माझ्यावर आला आहात, असे जोरदार तडाखे उद्धव ठाकरे यांनी लगावले.

म्हाळगी प्रबोधिनीतल्या कुंथन शिबिराचे काय झाले?

आमच्यातल्या गद्दारांना घेऊन तुम्ही असली शिवसेना म्हणून मिरवताय. आमची पोरं पळवता, वडील पळवता मग तुमचं कर्तृत्व काय? तुमची जी म्हाळगी प्रबोधिनी आहे तिथे कार्यकर्ते घडवण्यासाठी चालणाऱया चिंतन, कुंथन शिबिराचं काय झालं. तिथली माणसं कुठे गेली, असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला.

महाराष्ट्राला ओरबाडणाऱ्यांसोबत शिवसेनाप्रमुखांचा पुत्र कदापी जाणार नाही

माझ्याबद्दल दोन चांगले शब्द बोलून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करताय. आता दरवाजे उघडा नाहीतर काहीही करा, मी तुमच्याकडे नाही येत हे आजच सांगतो. महाराष्ट्राला ओरबाडणाऱयांसोबत शिवसेनाप्रमुखांचा पुत्र कदापी जाणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच शिवसेना झिंदाबाद.. उद्धव ठाकरे आगे बढोच्या घोषणा घुमल्या.

उद्धव ठाकरेंना खतम करण्यासाठी तुम्हाला देशाने मते दिली आहेत काय?

चीन तुमच्या धोतरात घुसला आहे. कश्मीरात पूंछमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला झाला. त्यात काही जवान शहीद झाले आहेत. हे मोदी, शहा तिकडे जात नाहीत. पण महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे संपला पाहिजे म्हणून ते इथे सभा घेत आहेत. अरे, उद्धव ठाकरे मोठा की देश मोठा? उद्धव ठाकरेंना खतम करण्यासाठी तुम्हाला देशाने मते दिली आहेत काय, असा घणाघाती सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

भ्रष्टाचाऱयांच्या पाठीवर बसून घोडा घोडा काय खेळता?

प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासारख्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या लोकांना वॉशिंग मशीनमध्ये टाकून तुम्ही उमेदवाऱया देताय याची लाज वाटत नाही काय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ज्यांच्याविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केली, आक्रोश केला आता त्यांच्या पाठीवरच बसून तुम्ही घोडा घोडा काय खेळताय, असा मोदी, शहांचा ठाकरी भाषेत समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला.

शिवसैनिकांना तुरुंगात टाकणाऱयांना त्याच तुरुंगात डांबणार

यांची समोरासमोर लढण्याची हिंमत नाही. मग जे निष्ठावान शिवसैनिक पैशाने विकले जात नाहीत त्यांना तुरुंगात टाकतात. तुम्ही निष्ठावंत संजय राऊत यांना तुरुंगात टाकले. ते झुकले नाहीत. एम.के. मढवी तुरुंगात आहेत, पण ते भाजपकडे जायला तयार नाहीत. यांच्या तुरुंगाच्या भिंती किती मजबूत आहेत ते बघतोच. हे तुरुंग आम्ही फोडणार नाही तसेच ठेवणार. कारण ज्यांनी माझ्या शिवसैनिकांना तुरुंगात टाकले उद्या त्यांनाच या तुरुंगात डांबणार, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

महाराष्ट्राने वाघनखे बाहेर काढली आहेत

महाराष्ट्र कुणावर वार करत नाही. पण पाठीत वार झाला तर तो वाघनखं बाहेर काढतो हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आज महाराष्ट्राने वाघनखे बाहेर काढली आहेत. लोकमान्यांच्या गर्जनेप्रमाणे महाराष्ट्र सध्या देशात असंतोषाचा जनक बनला आहे. शिवसेनेच्या मशालीमुळे हुकूमशहाच्या बुडाला आग लागणार आहे. मोदी आणि त्यांचे सरकार 4 जूननंतर रिटायर्डच नाही तर गेट आऊट होणार आहे, असा एल्गारच उद्धव ठाकरे यांनी केला.

शिवसेना नेते व रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते, शिवसेना नेते व ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार विद्या चव्हाण, शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री नसीम खान यांचीही यावेळी भाषणे झाली.

यावेळी सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्केकर, वरुण सरदेसाई, शिवसेना आमदार संजय पोतनीस, काँग्रेस नेते मुझ्झफ्फर हुसैन, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, नवी मुंबई जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, विठ्ठल मोरे, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, आपचे दिनेश ठाकूर, रमाकांत म्हात्रे, पूनम पाटील, ऐरोलीचे संपर्कप्रमुख विद्याधर चव्हाण, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, सूर्यकांत मढवी, शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे, युवासेना सहसचिव करण मढवी, चेतन नाईक, शेकापचे माजी आमदार पंडित पाटील, काँग्रेस प्रदेश चिटणीस ऍड. प्रकीण ठाकूर, शिवसेना कोकण पदवीधर मतदारसंघ समन्वयक किशोर जैन, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, संपर्कप्रमुख विष्णू पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ऍड. श्रध्दा ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र ठाकूर, शेकाप जिल्हा चिटणीस आस्काद पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शहरप्रमुख संदीप पालकर, आपचे रियाझ पठाण, वनिता बगके, सुभान अली, इम्तियाज पालकर, उल्का महाजन, प्रशांत मिसाळ, शिशिर धारकर, दिपश्री पोटफोडे, सतीश लोंढे, नृपाल पाटील, शंकर गुरव, सतीश लोंढे, सुप्रिया पाटील, मार्तंड नाखवा यांच्यासह इंडिया आघाडीतील घटकपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

हे माझे निवडणूक रोखे आहेत तेही भगवे

राहुल गांधी यांची बॅग विमानतळावर चेक होत असल्याच्या फोटोचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, आमच्या बॅगा तपासात असाल तर मोदी, शहांच्या बॅगाही तपासतानाचे फोटो आलेच पाहिजेत.तुम्ही निवडणुकीच्या सभेला येताना पंतप्रधानपदाच्या सगळय़ा सुविधा वापरता. एअर ट्रफिक बंद, रोड टॅफिक बंद, आम्ही तर रस्त्याने जातो. टॅफिकमध्ये थांबतो तेव्हा लोकं ओरडून सांगतात उद्धवजी यश मिळणारच. आणि हेच माझे निवडणूक रोखे आहेत. हे मी निवडणुकीत वापरणार. त्यातला एकही बोगस निघणार नाही. मोदीजी तुम्ही यावर जीएसटी लावू शकत नाही. कारण हे तुमच्या काळ्या पैशांचे रोखे नाहीत तर माझे भगवे रोखे आहेत, असे जबरदस्त फटकारे उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावले.

राजन विचारे यांचा कार्यअहवाल गद्दाराच्या छातीवर ठेवला तर तो पुन्हा उठणार नाही

कार्यसम्राट, निष्ठावान खासदार राजन विचारे यांचा अभिमान हिंदुहृदयसम्राट आणि धर्मवीर या दोघांनाही नक्कीच वाटत असेल. कारण शिवसेनेचे ठाणे आणि ठाणे शिवसेनेचे आहे हे तुम्ही सिद्ध केले. काही जणांना मस्ती आली आहे की, ठाणे आपली खासगी मालमत्ता आहे. ही मस्ती उतरवण्यासाठीच मी आलो आहे. विचारेंचा कार्यअहवाल त्या गद्दाराला दाखवा. हा कार्यअहवाल गद्दाराच्या छातीवर जरी ठेवला तरी तो पुन्हा उठणार नाही. विचारे यांनी दहा वर्षात केलेल्या कामाची तुलना मोदींनी स्वतःच्या कामाशी करून दाखवावी, असे आव्हान देतानाच गद्दारांचे डिपॉझिट जप्त करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

4 जूनला नरेंद्र मोदी रिटायर्ड होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटे बोलण्याची मशीन आहेत. त्यांनी दहा वर्षात देश फक्त लुटलाच नाही तर बरबाद केला आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सभांना राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे, लाखो लोक सभांसाठी जमत आहेत. ही गर्दी हे येत्या चार जून रोजी नरेंद्र मोदी यांना रिटायर्ड केल्याशिवाय राहणार नाही, असा दुर्दम्य विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज नवी मुंबईतील सभेत व्यक्त केला. खासदार राऊत पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी हे निराश, हताश आणि हतबल माणूस बनले आहेत. तुम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण चोरला, आता तुमचे कमळ महाराष्ट्र राहू देणार नाही. भाजप राजकीय नकाशावरून नष्ट होईल, असा इशारा त्यांनी दिला. गुजरातच्या दोन चोरांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला तरी शिवसेना संपली नाही. धनुष्यबाण चोरून तुम्ही ज्या गोल्डन यांच्या हातात दिलाय त्या गोल्डन गँगची एक्सपायरी डेट आता संपलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात परिवर्तन होणार आहे. त्यामुळे हुकूमशाहांची तडफड आणि फडफड कायमची थांबणार आहे. झोला लेकर आया था झोला लेकर जाऊंगा, असे म्हणाऱ्या मोदींना त्यांच्या इच्छेनुसार हिमालयात जावे लागणार आहे, असे फटकारेही खासदार संजय राऊत यांनी याकेळी भाजपवाल्यांना लगावले.

तुम्ही न्यायालयावर दबाव आणताय

सर्वोच्च न्यायालय म्हणाले, लोकप्रतिनिधींच्या संख्येवर पक्ष कुणाचा हे ठरवता येत नाही. तरीही मोदीजी तुम्ही आम्हाला नकली सेना म्हणताय. याचाच अर्थ तुम्ही सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणताय हे मी आज जाहीरपणे सांगतो. असा किती दबाव तुम्ही आणाल पाहतोच, असे उद्धव ठाकरे गरजले.