Lok Sabha Election 2024 – विकसित भारतचे मेसेज ताबडतोब थांबवा! ECIचे केंद्र सरकारला आदेश

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर देशभरात अनेक नागरिकांच्या व्हॉट्सअॅपवर केंद्र सरकारने मेसेज पाठवायला सुरुवात केली आहे. हे मेसेज ताबडतोब थांबवा असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

विकसित भारत अशा नावाने हे मेसेज काही दिवसांपूर्वी अनेकांच्या व्हॉट्सअॅप आणि मेसेज सुविधेवर आले होते. ते केंद्र सरकारकडून पाठवण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचार संहिता लागू झाली आहे. तरीही सरकारकडून हे मेसेज लोकांना पाठवण्यात आले आहेत, अशी तक्रार आयोगाकडे दाखल झाली होती. त्या तक्रारीची दखल आयोगाने घेतली आहे.

त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला हे मेसेज त्वरित थांबवावेत असे आदेश दिले असून त्या संदर्भात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रौद्योगिकी मंत्रालयाला अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

16 मार्च रोजी लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. सात टप्प्यात हे मतदान पार पडणार आहे. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. तत्पूर्वी प्रत्येकाला समान संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूनेच ही कारवाई केल्याचं आयोगाचं म्हणणं आहे.