आचारसंहितेची ऐशी की तैशी; डोंबिवलीत मोदींचे विनापरवाना पोस्टर्स, मानपाड्यात गुन्हा दाखल

ठाण्यापाठोपाठ डोंबिवलीतही आचारसंहिता धाब्यावर बसवल्याचे समोर आले आहे. वर्तकनगरमध्ये भाजपने सुरू केलेल्या जिल्हा कार्यालयावर मोदी, फडणवीस यांच्या छायाचित्रांबरोबर पक्ष नाव व कमळ चिन्ह उघडपणे झळकत आहे. यावरून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असतानाच आता डोंबिवलीच्या शिळफाट्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर्स लावून आश्वासनांचे गाजर दाखवण्यात आले आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघावर डोळा असलेल्या भाजपने मिंध्यांना चेपण्यासाठी वर्तकनगर येथे जिल्हा कार्यालय थाटले आहे. मात्र आचारसंहिता असतानादेखील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर भारतीय जनता पार्टी, कमळाचे दोन लोगो व त्या खालोखाल मोदी व फडणवीस यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी पालिकेकडे विचारणा केली असता कार्यालय व पोस्टर्स यांना विशेष परवानगी दिल्याचे सांगितले. मात्र पक्ष नाव व कमळ चिन्ह उघडपणे दिसत असतानादेखील निवडणूक अधिकारी मूग गिळून गप्प आहेत. यावरून टीकेची झोड उठली असतानाच आता डोंबिवलीतही असाच प्रकार उघडकीस आला आहे.

डोंबिवली पूर्वेकडील कल्याण-शीळ रोडवर एक जाहिरात लावली असून त्यावर मोदींचा फोटो आहे. या जाहिरातीत चार कोटी पक्की घरे, मोदींची गॅरंटी अशी जाहिरातबाजी करण्यात आली आहे. विनापरवानगी लावण्यात आलेल्या या होर्डिंग्जबाबत तक्रार येताच पालिकेचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी मानपाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्यानंतर संबंधित एजन्सीविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.