अख्खा देश म्हणतोय, गो बॅक मोदी! दक्षिण मध्य मुंबईत जनसंवादाचे तुफान

मुंबई महाराष्ट्राला मिळण्यासाठी 105 हुतात्म्यांनी बलीदान दिले. शेकडो जणांनी घाम गाळल्यानंतर, कष्ट केल्यानंतरच मुंबई महाराष्ट्राला मिळालीय. देशाचे आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईतून तब्बल 36 टक्के कर मुंबईतून जात असल्याने मोदी-शहांना प्रचंड पोटदुखी आहे. त्यामुळे मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी मुंबई-महाराष्ट्राला मिळणारे सर्वकाही गुजरातला पळवले जात आहे. मात्र हे कारस्थान आता उघड झाले आहे. जनता 2014 आणि 2019 अशा दोन वेळा फसली आहे. मात्र आता महाराष्ट्राच्या तोंडातला घास पळवणाऱयांना गुजरातला परत पाठवणार. अख्खा देशच आता ‘गो बॅक मोदी’ म्हणतो आहे, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मध्य मुंबईतील महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ अँटॉप हिल येथे घेतलेल्या प्रचंड जाहीर सभेत जनसंवादाचे तुफानच उसळले. यावेळी मिंधे आणि भाजपच्या कारस्थानाने मुंबई-महाराष्ट्राच्या सुरू असलेल्या लुटीचा पर्दाफाश उद्धव ठाकरे यांनी केला. आता महाराष्ट्राच्या तोंडातला घास काढून घेऊ देणार नाही, तर मोदींना गुजरातला पाठवणार असा निर्धारच यावेळी त्यांनी व्यक्त केला. संपूर्ण देशभरातच हेच चित्र आहे. भाजपने जनतेला 2014 आणि 2019 मध्येही फसवले. अच्छे दिन येणार, प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख येणार, देशातल्या प्रत्येकाला घर देणार अशी आश्वासने दिली. त्यांचे पुढे काय झाले? अच्छे दिन दहा वर्षांत आले का, असा सवाल त्यांनी केला. आता तर थेट 2047च्या गोष्टी करू लागले आहेत. आता म्हणतील देशातल्या 140 कोटी लोकांसाठी थेट चंद्रावर जाण्यासाठी रस्ता बांधून देऊ. ब्रीज करून देऊ. म्हणजे तुम्ही थेट चंद्रावर जाऊ शकाल. यावेळी उपस्थितांमधून भाजपच्या फसवेगिरीविरोधात जोरदार हशा पिकला. मुंबई महाराष्ट्राला मोठय़ा कष्टाने मिळाली आहे. याबाबत एका परदेशी पत्रकार ताया झिंकिन हिने ‘रिपोर्टिंग इंडिया’मध्ये लिहिताना गोळीबाराची माहिती लिहीली आहे. यावेळी त्या रुग्णालयात गेल्या असता तब्बल 200 ते 250 मृतदेह त्या ठिकाणी असल्याचे त्यांनी लिहिले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी आमदार प्रकाश फातर्पेकर, आमदार भाई जगताप, शिवसेना उपनेते सचिन अहिर, रवींद्र मिर्लेकर, सचिव साईनाथ दुर्गे, माजी महापौर श्रद्धा जाधव, राष्ट्रवादीच्या राखी जाधव, विभागप्रमुख प्रमोद शिंदे, विधानसभाप्रमुख गोपाळ शेलार, महिला विभाग संघटक पद्मा शिंदे, काँग्रेसचे रवी राजा, हुकूमराज मेहता, उपेंद्र दोशी, ‘आप’चे रोकडे, अर्जुन डांगळे, दीपक निकाळजे, सागर संसारे यांच्यासह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या विविध घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

आम्हाला मोदी सरकार नको, भारत सरकार पाहिजे!

मोदींच्या ‘ईडी’, इन्कम टॅक्स, ‘सीबीआय’च्या ताकदीचे बारा वाजवण्याची ताकद आणि हिंमत तुमच्या एका बोटामध्ये आहे. आम्हाला मोदी सरकार नको आहे, तर भारत सरकार हवे आहे, अशी गर्जना करतानाच कार्यकर्त्यांनी प्रत्येक वॉर्डात फिरून शिवसेनेसह आपल्या मित्रपक्षाचे उमेदवार असतील त्यांच्या प्रचारासाठी काम करावे आणि मशालीप्रमाणेच काँग्रेसचा हात आणि राष्ट्रवादीची तुतारी घराघरात पोहचवून विजयाची तुतारी फुंका असे आवाहनी त्यांनी केले.

इंडिया’ गुजरातला हक्काच देणार

मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी सगळं काही गुजरात अहमदाबादला पळवणे सुरू आहे. यामध्ये सर्वात मोठय़ा सिमेंट उद्योग, हिरे व्यापार गुजरातला पळवण्याचा डाव सुरू आहे. मात्र आम्हाला गुजरातचा द्वेष नाही, त्यामुळेच ‘इंडिया’ आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही गुजरातच्या हक्काचे नक्की देणार, असा टोलाही त्यांनी लगावला.

मशालीच्या आगीने हुकूमशाही राजवट भस्म करा

गद्दरांनी राजकीय आईवर, आईच्या कुशीवर विश्वासघाताचा वार केला आहे. त्यामुळे तुम्हाला आता निष्ठावान खासदार पाहिजे की गद्दार हे तुम्हीच ठरवा असे आवाहनही त्यांनी केले. रावणाला शिवधनुष्य पेलवले नाही, तर गद्दारांना कसे पेलवणार, असा टोलाही त्यांनी लगावला. त्यामुळे मशाल घेऊन हुकूमशाहीची राजवाट मशालीची आगीने भस्म करण्याची ताकद एका बोटामध्ये आहे. त्यामुळे या मशालीने हुकूमशाही राजवट भस्म करा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जय भवानी जय शिवाजी, शिवसेना झिंदाबा, उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांसह ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो’, ‘जय भीम’, असा जोरदार नारा करण्यात आला.

कोविड काळातील घोटाळय़ाचे पुरावे दाखवा 

कोविडच्या काळात महाविकास आघाडीच्या काळात जनतेने दिलेल्या सहकार्यामुळे आपण हे कोरोनाचे संकट परतवून लावू शकलो. मात्र भाजप आणि मिंध्यांकडून कामावर शंका घेऊन घोटाळय़ाचे आरोप केले जात आहे. खिचडी घोटाळा, बॉडीबॅग घोटाळय़ाचे आरोप होत आहेत. मात्र परवा कोर्टानेच मिंध्यांना कानफटवताना घोटाळा झाला तर पुरावे दाखवा, असे बजावले. यावेळी आवश्यक पुरावे नसल्याचे मिंधे म्हणाले. त्यामुळे यांना पुरावे की गाडावे, असा टोलाही त्यांनी लगावला. केवळ बदनामीसाठी आरोप केले जात आहेत याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला. कोरोना काळात 15 दिवसांत फिल्ड हॉस्पिटल उभारले, दोन लॅबची संख्या मुंबई- महाराष्ट्रासह 600 वर नेली. यामुळे लाखो जीव वाचले. बेडची संख्या साडेतीन लाख केली. ऑक्सिजन बेड सात-आठ हजार होती. एका वेळेला सवा लाख रुग्णांना ऑक्सिजन सज्जता देऊ केली. मोदींनी हे गुजरातमध्ये केले का? यात खरं माझं काwतुक नव्हते. जनतेचे आणि शासकीय यंत्रणेचे हे श्रेय होते. मी सांगत होतो ते तुम्ही ऐकत होता. म्हणून मुंबई वाचवली, महाराष्ट्र वाचला. मात्र मिंध्यांचे सरकार येताच कोविड योद्धय़ांना वाऱयावर सोडण्यात आले. पुण्याच्या ससून रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू पावलेली रुग्णसेविका अनिता पवार हिला 50 लाखांची नुकसानभरपाई देण्यास मिंधे सरकारने टाळाटाळ केली. याविरोधात कोर्टात दाद मागितल्यानंतर कोर्टाने चांगलेच फटकारले, कोविड योद्धय़ांची कदर नाही का, असे फटकारल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आता सर्व काही सरकारच्या कॉण्ट्रक्टर मित्रांसाठी सुरू आहे. डोळय़ादेखत महाराष्ट्राचे वस्त्रहरण होत असेल तर डोळय़ावर पट्टी बांधून गप्प बसणार का, असा सवालही त्यांनी केला.

लुटारू ‘एमएमआरडीए’ला मुंबईबाहेर टाकणार

पालिकेत सध्या मिंधे सरकारच्या इशाऱयावर कॉण्ट्रक्टरच्या फायद्यांसाठी काम सुरू आहे.मेट्रोच्या कामासाठी पालिकेकडून तीन हजार कोटी रुपये त्यांच्या कॉण्ट्रक्टरच्या उरावर घातले जात आहेत. पालिकेला दीडशे वर्षे झालीत. एमएमआरडीए आता आली आहे. असे असताना एमएमआरडीएसाठी पालिका का लुटता असा सवालही त्यांनी केला. आमचे सरकार आल्यावर या लुटारू एमएमआरडीएला मुंबई पालिका क्षेत्रातून बाहेर टाकू असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला. पालिकेची लूट सुरू असल्याने असेच सुरू राहिल्यास कर्मचाऱयांचे पगार द्यायला पैसे शिल्लक राहणार नाहीत. पगाराचे पैसे देण्यासाठी दिल्लीच्या दारात उभे रहावे लागेल, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.

बाळासाहेबांच्या खोलीची किमंत कोडग्या फडणवीसांना समजणार नाही

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पह्डून काढले. ज्या खोलीला फडणवीस कुठली तरी खोली म्हणता ती शिवसेनाप्रमुखांची खोली आहे. आमच्यासाठी ते मंदिरच आहे. कुठल्याही शुभकार्यासाठी जाताना आम्ही त्या ठिकाणी नतमस्तक होतो. पुलवामा हल्ल्यानंतर शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी अमित शहा याच ठिकाणी नाक रगडायला आले होते. अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाबाबत याच ठिकाणी अमित शहांनी ‘ठीक आहे’ असे म्हणत आश्वासन दिले होते. याच खोलीत अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, प्रमोद महाजनही आले होते. मात्र शहांनी त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना बाहेर बसायला सांगितले होते. कारण त्यांच्या विचारांची ‘खोली’च तितकी आहे. आमच्या या मंदिराला ‘कसली तरी खोली’ म्हणणाऱया फडणवीसांना जनाची किंवा मनाचीही लाज नाही असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला. ते चरफडून बोलत आहेत. फडणवीस नालायक, कोडगा माणूस आहे. तुमचे विचार उथळ आहेत. तुम्ही चरफडून बोलत आहात. कारण तुमच्या चहुबाजूंनी रान पेटले आहे. ते आता विझवता येणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.