राज्यात तीन दिवस मुसळधार, मुंबईची हवा सुधारणार; धुरके विरणार

मुंबई, दि. 24 (प्रतिनिधी) – राज्यभरात 25 ते 27 नोव्हेंबर या तीन दिवसांत अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला. तर सप्टेंबरमध्येही पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नाही. त्यानंतर 15 ऑक्टोबरपूर्वीच मान्सूनने महाराष्ट्रातून काढता पाय घेतला. आता नोव्हेंबरच्या शेवटी वरुणराजा अचानक बरसणार आहे. या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून खराब असलेली मुंबईची हवा सुधारून धुरके विरेल अशी आशा आहे. दरम्यान, विदर्भात मात्र हवामान कोरडे राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

उत्तरेकडे बर्फवृष्टी झाल्यामुळे महाराष्ट्रात अनेक भागांत गारवा आहे. मुंबई, ठाण्यात पहाटेच्या सुमारास थोडा गारवा जाणवत आहे. मात्र आता ऐन हिवाळय़ात राज्यभरात पावसाळय़ाचा अनुभव येणार आहे. दरम्यान, मुंबईत अनेक भागांत आज शुक्रवारी 23 ते 25 किमान अंश सेल्सियस तर 34 ते 35 कमाल अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्यातच आर्द्रतेचे प्रमाणही 70 टक्क्यांहून अधिक असल्यामुळे दिवसभर उकाडा कायम होता.

का पडणार पाऊस?

उत्तर पाकिस्तानकडून अरबी समुद्रापर्यंत तसेच केरळ ते महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र आणि गुजरात तसेच मध्य प्रदेशातील पश्चिमेकडील भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे ‘स्कायमेट’च्या महेश पलावत यांनी सांगितले.

इथे मुसळधार पाऊस

नाशिक, मालेगाव, जळगाव, मध्य महाराष्ट्र, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशीम, बुलढाणा, अकोल्यात मुसळधार तर मुंबई, ठाणे, पालघर आणि डहाणू येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची हजेरी 

सिंधुदुर्गात सायंकाळी साडेचारच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना कापणी केलेले भात गोळा करणे, भात गवत झाकून ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

कुलाबा, बीकेसीची हवा सुधारेना

विविध बांधकामे, मेट्रोची कामे यामुळे मुंबईत अनेक भागांत धुरके कायम आहे. कुलाबा आणि बीकेसीची हवा विषारी असल्याचेच शुक्रवारी पुन्हा एकदा दिसले. तर मालाड, भांडुप, बोरिवली, अंधेरी येथील हवाही सुधारलेली नाही.

ठिकाण   हवा (एक्यूआय)        दर्जा

कुलाबा     228                  खराब

माझगाव  139                  साधारण

बीकेसी     221                  खराब

वरळी      93                    समाधानकारक